शासकीय दंत चिकित्सकही ठरताहेत कोरोना योद्धे, काय असावे कारण...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जून 2020

स्त्राव घेण्यासाठी मेयो, मेडिकलसह एम्सचे डॉक्‍टर नियमितपणे येथे नेमलेल्या गटानुसार काम करीत होते. रुग्ण व संशयितांची वाढती संख्या बघता विभागीय आयुकत डॉ. संजीवकुमार यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पथक सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.

नागपूर : कोरोनाची महामारी सुरू असताना वैद्यकीय अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी यांच्या कर्तव्यनिष्ठतेची कडवी परीक्षा सुरू आहे. कर्तव्यात कसूर न करता इमाने इतबारे ते आपले कर्तव्य करीत आहेत. यात दंतचिकित्सकही कोरोना योद्धा म्हणून काम करीत आहेत. नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील दंत चिकित्सकांनी, निवासी दंत चिकित्सकांनी या दोन महिन्यात 1100 पेक्षा अधिक जणांचे नमुने कोरोना चाचणीसाठी घेतले. त्यांचे दंत महाविद्यालयात कौतुक होत आहे.

कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागपूर शहरातील अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. अनेक लोकांचे विविध ठिकाणी विलगीकरण करण्यात आले. कोविड-19 च्या रुग्णांचे रोगनिदान करण्यासाठी नाक व घशाचे स्त्राव घेणे गरजेचे असते. स्त्राव घेण्यासाठी मेयो, मेडिकलसह एम्सचे डॉक्‍टर नियमितपणे येथे नेमलेल्या गटानुसार काम करीत होते. रुग्ण व संशयितांची वाढती संख्या बघता विभागीय आयुकत डॉ. संजीवकुमार यांनी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील पथक सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार दंत चिकित्सक तसेच आरोग्य तंत्रज्ञांच्या तीन पथकांची नियुक्‍ती केली. प्रत्येक पथकात सहाय्यक प्राध्यापक, पदव्युत्तर विद्यार्थी व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. या तिनही गटांना मेडिकलचा ईएनटी विभागाकडून स्वॅब घेण्याचे प्रशिक्षण दिले. त्यानुसार दंतचे अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात कोविड चाचण्यांसाठी नमुने घेण्यासाठी तसेच आरोग्यसेवा देण्यासाठी तत्पर झाले.

किती बॉयफ्रेंड आहेत तुला, मित्राने केली विचारणा आणि...

विलगीकरणात जाऊन घेतले नमुने

शासकीय दंत महाविद्यालयाच्या मुखरोग निदान व क्ष-किरण विभागाच्या सहयोगी प्राध्यापक कोविड-19च्या नोडल अधिकारी डॉ. आशिता कळसकर यांच्या नेतृत्वातील पथकांनी शहरातील विलगीकरण केंद्र असलेल्या मंगलमूर्ती लॉन्स, आमदार निवास, नीरी, व्हीएनआयटी, सिम्बॉयसिस महाविद्यालय, विधी महाविद्यालय, पाचपावली पोलिस क्वार्टर येथे जाऊन प्रत्येक व्यक्तीचे नमुने घेतले. अधिष्ठाता डॉ. फडनाईक यांच्या मार्गदर्शनात डॉ. सचिन खत्री, डॉ. कल्पक पिटर, डॉ. योगेश इंगोले यांच्या प्रयत्नातून नमुने घेण्यात आले.
 

डॉक्‍टरांनी घेतले 1748 स्त्राव

दंतच्या डॉक्‍टरांमध्ये डॉ. योगेश राठोड, डॉ. श्वेता गंगोत्री, डॉ. वैशाली सार्वे आणि पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. बेनिता फर्नांडीस, डॉ. नेहा गुप्ता, डॉ. वैष्णवी चोडणकर, डॉ. नियती मेहता, डॉ. छलांग मारक, डॉ. निहरिका मिस्त्री, डॉ. राजेश इजलकर, डॉ. सुबोध पुरोहित यांच्यासह पॅरामेडिकल कर्मचारी आशा राठोड, राजेश राऊत, अश्‍चिन खांडेकर, युवराज रामटेके, मयूर टेंभरे, नितीन गेडाम, सुनील पंत, धनराज सुरपाम, जयलक्ष्मी नायडू यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करीत तब्बल 1748 जणांचे स्वॅब घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1800 samples of Kovid-19 taken by dentists