पतंगीच्या नादात धावताना 'तो' अचानक पोहोचला रेल्वेरुळावर अन् घडली धडकी भरवणारी घटना

अनिल कांबळे 
Wednesday, 6 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटा हा आपल्या आजीसोबत पुलाखाली उघड्यावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडीलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती.

नागपूर ः मकरसंक्रांतीला आठवडाभर वेळ असतानाच नागपुरात पतंगाची काटा-काटी सुरू झाली आहे. कटलेली पतंग पकडण्याच्या नादात १२ वर्षीय मुलगा रेल्वे रूळावर पोहचला. दरम्यान भरधाव रेल्वे आल्याने मुलाचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. एन्टा विनोद सोळंकी (शिवकृष्णधामजवळ, वॉक्स कुलरच्या ब्रीजखाली, कोराडी) असे मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एंटा हा आपल्या आजीसोबत पुलाखाली उघड्यावर राहत होता. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वडीलाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्याची आई सोडून गेली. त्याची आजी भीक मागून एंटाचे पालनपोषण करीत होती. त्याचे खरे नाव कुणालाही माहिती नाही. त्याला एंटा म्हणूनच ओळखल्या जाते. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

एन्टा गेल्या आठ दिवसांपासून आजीला पतंग विकत घेऊन मागत होता. मात्र, त्याच्या आजीचा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्याला पतंग मिळाली नाही. त्यामुळे तो रस्त्यावरील किंवा अडकलेल्या पतंग आणि तुटलेला मांजा जमा करून आपला छंद पूर्ण करीत होता. एंटा सोळंकी हा मंगळवारी सकाळपासूनच कटलेल्या पतंगी जमा करीत होता. 

दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारात तो कटलेल्या पतंगीच्या मागे धावत होता. पतंगीकडे लक्ष ठेवत धावताना तो शिवकृष्णधाम झोपडपट्टीजवळील दिल्ली ते नागपूर रेल्वे लाईनवर गेला. या दरम्यान रेल्वे येत होती. रेल्वेची जबर धडक एंटाला लागली. त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. आजुबाजूच्या लोकांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी घटनास्थळावर लगेच धाव घेतली. त्यांनी कोराडी पोलिसांना फोन केला. पोलिसांचा ताफा घटनास्थळावर पोहचला. 

जाणून घ्या - शेतातील विहिरीत तरंगतांना दिसला बिबट्याचा मृतदेह; बाहेर काढताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप 

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मेयोत रवाना केला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. गेल्या आठ दिवसांतील पतंगीच्या नादात गेलेला हा दुसरा बळी आहे.  यापूर्वी एमआयडीसीमध्ये एका कारच्या धडकेत यश नावाच्या १३ वर्षाच्या मुलाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. तर मानकापूरात आदित्या नावाच्या विद्यार्थ्याचा नायलॉन मांजामुळे गळा कापला होता.  पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे पतंग विक्रेत्यांमध्ये नायलॉन मांजा विक्रीची होड लागली आहे, हे विशेष. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: !2 Year Boy is no more in Nagpur Due to train accident Latest News