अरे काय हे दुर्दैव! कुठे भिंत खचली तर कुठे चूल विझली; तब्बल इतक्या गावांत पाणीच पाणी

नीलेश डोये
Saturday, 29 August 2020

२५ गावातील २ हजार ९०० कुटुंब बेघर झाली. पाण्यामुळे अनेकांची भिंत खचली आणि चूलही विझल्याचे चित्र आहे. पावसामुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

नागपूर : गेल्या २४ तासात झालेल्या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर परिस्थिती आली असून पाणी लोकांच्या घरात शिरले. यामुळे मोठे नुकसान झाले असून २५ गावातील २ हजार ९०० कुटुंब बेघर झाली. पाण्यामुळे अनेकांची भिंत खचली आणि चूलही विझल्याचे चित्र आहे. पावसामुळे शेत पिकांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येते.

शुक्रवार सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. नागपूर जिल्हयात ८१.४३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगांव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे १६ व १४ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे चार तालुक्यातील २५ गावांमध्ये पाणी शिरले.

४५ हजार हेक्टरवर सोयाबीन पिकांचे नुकासान 

यात २ हजार ९०७ कुटुंबातील ११०६४ व्यक्ती बाधित झाले. यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. मौदा तालुक्यातील मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसेच वडना ही ९ गावे बाधित झाली आहे. कामठी तालुक्यातील गोराबाजार, सोनेगांव, अजनी, भामेवाडा, जुनी कामठी, बिना, नेरी तसेच बिडबिना ही ८ गावे, पारशिवनी तालुक्यातील काळाफाटा, पिपरी, जुनी कामठी, सिंगारदिप, सालई मावली तसेच पाली ही ६ गावे तर कुही तालुक्यातील चिचघाट तसेच आवरमारा या 2 गावात पाण्याने नुकसान झाले आहे.

नागरिक सुरक्षित स्थळी

सडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचाव कार्य करीत आहेत. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी.

घरे पडली

अतिपावसामुळे नगरधन येथील जवळपास १५ ते २० घरे पडली. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य दुधराम सव्वालाखे यांनी दिली. माहिती येताच त्यांनी नगरधनला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पटवारी यांना फोनवरून माहिती देत पंचनामा करण्याच्या सूचना केली. नगरधन येथील सरपंच प्रशांतभाऊ कामडी, पिंटूभाऊ नंदनवार, वाघमारे सर, राजूजी गडपायले, स्नेहदीप वाघमारे, सुरेंद्र बिरनवार इतर गावकरी मंडली उपस्थित होते. नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली.

जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर

तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा : कुंभारे

कळमेश्वर, सावनेर तालुक्यासह संपूर्णच जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व गट नेते मनोहर कुंभारे यांनी केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 villages in Nagpur District flooded with water