दुसरी लाट त्सुनामीच : नागपूर जिल्ह्यात २७ हजार कोरोनाबाधित; शनिवारी ३ हजार ६७९ नवे बाधित व २९ मृत्यू

27000 corona affected in Nagpur district Corona update news
27000 corona affected in Nagpur district Corona update news

नागपूर : अकरा मार्च २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित नागपुरात आढळून आला. त्यावेळी जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांची एकाच वेळी असलेली कोरोनाबाधितांची संख्या १५ हजारापर्यंत पोहोचली होती. मात्र, कोरोनाच्या दुसरी लाट जणू त्सुनामीच ठरली आहे. बाधितांच्या विक्रमांची नोंद होत असतानाच जिल्ह्यात सक्रिय कोरोनाबाधितांचा उच्चांक आहे. नागपूर जिल्ह्यात २७ हजारांवर कोरोनाबाधित असून गृहविलगीकरणातील २० हजार ४९२ बाधित संसर्गाचे वाहक ठरत आहेत. मात्र, प्रशासन ढिम्म आहे. त्यातच शनिवारी ३ हजार ६७९ बाधित आढळले. तर २९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

वर्षभरात नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ८९ हजार ४६६ झाली आहे. तर मृतकांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. २०२१ च्या मार्च महिन्यात कोरोनाच्या संसर्गाचे तांडव सुरू झाले. गेल्या चार दिवसांपासून दर दिवसाला ३ हजारा पलिकडे कोरोनाबाधितांचा आकडा फुगत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने आज एक नवा विक्रम नोंदवला आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २७ हजार ६२५ झाली आहे. यात शहरातील २१ हजार ९९१ आणि ग्रामीण भागातील ५ हजार ६३४ कोरोनाबाधितांचा समावेश आहे. विशेष असे की, एकूण सक्रिय कोरोनाबाधितांपैकी २० हजार ४९२ जण गृह विलगीकरणात आहेत. तर सौम्य, मध्यम व तीव्र अशी लक्षणे असलेले ७ हजार १३३ कोरोनाचे रुग्ण मेयो, मेडिकलसह इतर शासकीय व खासगी रुग्णालयांसोबतच कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत.

मागील २४ तासांमध्ये २९ जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे. यात शहरातील १७ तर, ग्रामीण भागातील ९ जणांचा आणि जिल्ह्याबाहेरील ३ जणांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ४ हजार ५९२ वर पोहचली आहे. बाधितांसोबतच वाढत असलेली मृतकांची संख्या ही गंभीर बाब असून प्रशासनच्या चिंतेत भर पाडणारी आहे.

चाचण्यांचाही उच्चांक

जिल्ह्यात कोरना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याच तुलनेत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. २०२० मध्ये एका दिवसातील सर्वाधिक चाचण्यांची संख्या १० हजार होती. मात्र मार्च महिन्यात चाचण्यांचा वेग वाढवला. मार्च २०२१ मध्ये दर दिवसाला १२ हजार ते १६ हजार या दरम्यान चाचण्या होत आहे. २० मार्च रोजी १६ हजार ३८७ चाचण्या झाल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर पोहचले होते. मात्र बाधितांची संख्या वाढल्यानंतर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्येत घट झाली आहे. शनिवारी बाधितांच्या तुलनेत निम्म्याहून कमी म्हणजेच १ हजार ५९४ जणांनी कोरोनावर मात केली. एकूण कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ५७ हजार २४९ झाली आहे. तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण घटून ८३ टक्क्यांवर आले आहे.

तीन दिवसांत ८० कोरोनाबळी

जिल्ह्यात शनिवारी २९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. मागील तीन दिवसांत जिल्ह्यात तब्बल ८० कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. शहरी भागात १७ मार्च रोजी १७ कोरोनाबाधितांचे मृत्यू झाले. १८ मार्चरोजी ३५ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. १९ मार्चला कोरोनाच्या दंशामुळे २९ जणांना जीव गमवावा लागला. या तीन दिवसांत मृत्यू वाढल्याने आरोग्य विभागात चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com