बापरे ! काळजी घ्या, नरखेड तालुक्‍यात आढळले नव्याने तीन रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जून 2020

27 मे रोजी मुंबईवरून तालुक्‍यात एकूण सोळा जण ट्रॅव्हल बसने आले होते. मन्नाथखेडी येथील नऊ जणांचा यात समावेश होता. त्यापैकी दोघांचा शनिवारी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे उपचाराकरिता पाठवून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 43 जणांना लॉ कॉलेज हॉस्टेल, नागपूर येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकीच आज वडील, मुलगी व इतर एक यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

जलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील कंटेन्मेंट झोन असलेल्या मन्नाथखेडी येथील तिघांचा कोविड-तपासणी अहवाल बुधवारी (ता.3) पॉझिटिव्ह आला. तालुक्‍यात एकूण रुग्णसंख्या पाच झाली. आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण लॉकॉलेज होस्टेल, नागपूर येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्रातील असून त्यांचे मुंबई "कनेक्‍शन' आहे. दिवसेंदिवस तालुक्‍यात वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाची खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : दुधाने आणली डोळे पांढरे होण्याची वेळ, काय घडले असे...

मुंबईवरून खासगी बसने परतले होते गावाला
27 मे रोजी मुंबईवरून तालुक्‍यात एकूण सोळा जण ट्रॅव्हल बसने आले होते. मन्नाथखेडी येथील नऊ जणांचा यात समावेश होता. त्यापैकी दोघांचा शनिवारी तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्या दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे उपचाराकरिता पाठवून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर 43 जणांना लॉ कॉलेज हॉस्टेल, नागपूर येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकीच आज वडील, मुलगी व इतर एक यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
27 मे ते30 मेपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे मन्नाथखेडी येथील शाळेच्या इमारतीत विलगीकरण करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात गावातील सरपंचासह दहा-बारा जण शाळेच्या इमारतीत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यांना प्रशासनाचे होमक्‍वारंटाइन केले आहे.
हे होमक्‍वारंटाइन असलेले नागरिक बिनदिक्कत गावात फिरत असून इतरांच्या संपर्कात आहेत. त्यावर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, अशी कैफियत मन्नाथखेडी येथील नागरिकांनी व्यक्त केली. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मन्नाथखेडी येथील सर्वांना संस्थात्मक विलगीकरण केंद्रात पाठविणे गरजेचे आहे. अन्यथा मन्नाथखेडी रुग्णसंख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

नक्‍की हे वाचा : आता पुरे झाले, रस्त्यावर थुंकलात तर पडू शकते महागात

एका कुटुंबातील आठ सदस्य होमक्वारंटाइन
बेलोनाला लागून असलेल्या मध्य प्रदेशातील खापरखेडा येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या हायरिस्क संपर्कात आलेला कामगार बेलोना येथे हार्डवेअर दुकानात कामगार आहे. या कारणावरून दुकानदार व त्याच्या कुटुंबातील सदस्यासह आठ जणांना होमक्वारंटाइन केले आहे. तसेच दुकानात काम करताना हायरिस्क असलेला कामगार बेलोना व परिसरातील शेकडो लोकांच्या संपर्कात आलेला आहे. त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली आहे. काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा तालुक्‍यात रुग्णांची आकडेवारी वाढू शकते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 3 Corona passitive in narkhed