लॉकडाउनच्या काळात नागपुरात आली 35 खासगी विमाने

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जून 2020

मार्चमध्ये लॅाकडाउन जाहीर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच विमानसेवेला बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या काळातही नागपूर येथील विमानतळावर काही खासगी विमाने उतरली होती. यामुळे थोडाफार महसूलही मिळाला आहे.

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून दररोज सरासरी 32 विमाने उड्डाण भरतात. लॉकडाउनच्या काळात ही सर्व नियमित विमाने बंद असली तरी 22 मार्च ते 24 मे दरम्यान एकूण 35 खासगी एअरक्राफ्ट व हेलिकॉप्टर लॅंड झाले. त्यातून 7.20 लाखांचा महसूल मिळाला. सोबतच संपलेल्या आर्थिक वर्षात विमानतळाला विविध स्रोतांमधून एकूण 118.97 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले.
शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मागविलेल्या माहितीतून ही आकडेवारी पुढे आली आहे. नागपूर विमानतळाचे वर्षभराचे उत्पन्न वाढले असले तरी विविध कारणांसाठी झालेला खर्चही 54.93 कोटींच्या घरात आहे. केवळ सुरक्षा व्यवस्थेवरच 5.96 कोटींचा खर्च झाला. मार्चमध्ये लॅाकडाउन जाहीर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच विमानसेवेला बंदी घालण्यात आली होती. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. तथापि, कोरोनाच्या काळातही नागपूर येथील विमानतळावर काही खासगी विमाने उतरली होती. यामुळे थोडाफार महसूलही मिळाला आहे.

वाचा- दिवसभर शोधायचे कुलूपबंद घर आणि रात्री करायचे हा प्रकार

1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या काळात नागपूर विमानतळावर एकूण 1 हजार 213 एअरक्रॉफ्ट व हेलिकॉप्टर्स लॅंड झाले. त्यातून 42 लाख 16 हजार 990 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. नियमित व खासगी विमानांमधून वर्षभरात एकूण 15लाख 22 हजार 577 प्रवासी आले, तर 15 लाख 33 हजार 424 प्रवासी विमानातून रवाना झाले. या प्रवाशांकडून 56.26 कोटींचा महसूल प्राप्त झाला. लॉकडाउनच्या काळात विमानसेवाच बंद असल्याने नियमित विमान संचलनातून एकही रुपयांचे उत्पन्न विमानतळ व्यवस्थापनाला मिळू शकले नाही.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 Private planes landed in Nagpur