नागपुरात 'बंटी-बबली'ने लावला व्यापाऱ्यांना चुना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

तांदूळ घेऊन बंटी-बबली निघून गेले. व्यापाऱ्यांनी महिनाभराने धनादेश बॅंकेत वटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खात्यांमध्ये पैसेच नसल्याची बाब समोर आली. व्यापाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण, आरोपी व्यापाऱ्यांना चुना लावून पसार झाले होते.

नागपूर : बंटी-बबली दाम्पत्याने व्यापार करण्याच्या नावाखाली इतवारी परिसरातील व्यापाऱ्यांना गंडवले. ही घटना लकडगंज पोलिस ठाण्यांतर्गत गुरुवारी उघडकीस आली. अरविंद बागडे आणि पूनम अरविंद बागडे असे आरोपी दाम्पत्याचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोषकुमार हजारीलाल अग्रवाल (72, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, गांधीबाग) यांचा आर. एस. ट्रेडिंग नावाने स्मॉल फॅक्‍टरी एरियामध्ये धान्याचा व्यवसाय आहे. 1 जुलै 2019 ला बंटी व बबलीने त्यांच्याशी संपर्क करून तांदळाचा व्यवसाय करण्याची इच्छा दर्शवली. प्रथम लाखो रुपयांचे तांदूळ खरेदी केले व त्याचे पैसेही दिले. अशा प्रकारे व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून 1 जुलै ते 30 ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये पुढील तारखेच्या धनादेश देऊन जवळपास 35 व्यापाऱ्यांकडून 57 लाख 75 हजार 681 रुपयांचे तांदूळ खरेदी केले. 

हेही वाचा : आता बोंबला! आरोपीला झाला कोरोना अन्‌ माजली खळबळ...

तांदूळ घेऊन बंटी-बबली निघून गेले. व्यापाऱ्यांनी महिनाभराने धनादेश बॅंकेत वटवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या खात्यांमध्ये पैसेच नसल्याची बाब समोर आली. व्यापाऱ्यांनी त्यांचा शोध घेतला. पण, आरोपी व्यापाऱ्यांना चुना लावून पसार झाले होते. शेवटी सर्वांनी मिळून संतोषकुमार यांच्या नावाने लकडगंज पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी सर्व व्यापाऱ्यांचे जबाब नोंदवून बंटी बबली दाम्पत्याविरुद्ध 57 लाख 75 हजार 681 रुपये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 35 Traders Cheated by couple