आता बोंबला! आरोपीला झाला कोरोना अन्‌ माजली खळबळ... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जून 2020

आरोपीला थोडेफार लक्षणही दिसत असल्यामुळे त्याच्या कोरोना टेस्ट अहवालाची प्रतीक्षा पोलिस कर्मचारीही करायला लागले. कालपर्यंत जीव भांड्यात पडलेल्या पोलिसांची धाकधूक वाढली आणि जे नको व्हायला तेच झाले. 

नागपूर : विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांच्या पथकाने अटक केली. न्यायालयात नेऊन त्याचा पीसीआर घेतला. परंतु, कारागृहात नेण्यापूर्वी त्याची कोरोना टेस्ट झाली आणि तो कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्याचा वैद्यकीय अहवाल येताच पोलिस ठाण्यात एकच खळबळ माजली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी हुडकेश्‍वर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका विनयभंगाच्या गुन्ह्यात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यात आणले. त्याला पोलिस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी न्यायालयात दाखल करण्यात आले. एक अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांसह त्या आरोपीला पोलिस व्हॅनमध्ये बसवून न्यायालयात नेले. 

न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. तीन दिवसांपूर्वी त्या आरोपीला हुडकेश्‍वर पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात दाखल केले. मात्र, कारागृहात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येक आरोपीची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्या आरोपीला थोडेफार लक्षणही दिसत असल्यामुळे त्याच्या कोरोना टेस्टच्या अहवालाची प्रतीक्षा पोलिस कर्मचारीही करायला लागले. कालपर्यंत जीव भांड्यात पडलेल्या पोलिसांची धाकधूक वाढली आणि जे नको व्हायला तेच झाले. 

हेही वाचा : प्रकाश आंबेडकर म्हणतात, अरविंद बनसोड प्रकरणाची सीबीआय चौकशी करा 

त्या आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्या आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर, आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्वच पोलिस कर्मचाऱ्यांची आज चाचणी घेण्यात आली. त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे. त्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाइन केल्याची माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused found Corona positive