आमिष देऊन त्याने बालमैत्रिणीला लावला चुना 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

ठकबाज आकाश हा सराफा व्यापारी आहे. चव्हाण निवृत्त झाले असून, ते संपूर्ण रक्कम बॅंकेत गुंतवत असल्याचे त्याला समजले. त्याने फिर्यादीला आकर्षक व्याजाचे आमिष दाखविले. बॅंकेत गुंतवणूक कराल तर असा किती व्याज मिळेल? मी तुम्हाला आकर्षक व्याज आणि हमीसुद्धा देतो, असे म्हणत त्याने चव्हाण यांचा विश्वास संपादन करून पैसे गुंतविण्यास भाग पाडले.

नागपूर : विदेशात राहणारी बालमैत्रीण आणि वेकोलितील वीज विभागातून सेवानिवृत्त झालेल्या तिच्या वडिलाला एका युवकाने आकर्षक व्याज आणि गुंतवणुकीचे आमिष देऊन 37 लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आकाश हर्ष (30, रा. आकाश पॅलेस, अयोध्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. 

विजय चव्हाण (68, श्रीनगर, मानेवाडा) हे 2016 मध्ये वेकोलितून सेवानिवृत्त झाले. ते आरोपी आकाश हर्ष याच्या घराशेजारी राहतात. त्यामुळे आकाश आणि त्यांची मुलगी मेघा हे दोघे बालमित्र आहेत. त्यामुळे तो घरच्यासारखाच सदस्य होता. चव्हाण कुटुंब त्याला बालपणापासून पाहत असल्याने त्याच्यावर संशय घेण्याचेही कारण नव्हते. याच संधीचा आकाशने फायदा घेतला. विजय चव्हाण हे वेकोलिमध्ये चांगल्या पदावर होते. 8 वर्षांपूर्वी ते सेवानिवृत्त झाले. निवृत्तीच्या रकमेचा चांगला उपयोग व्हावा. ती रक्कम सुरक्षित राहावी, यासाठी चव्हाण कुटुंबीयांचा विचार सुरू होता. ही रक्कम त्यांनी बॅंकेत ठेवण्याचे ठरविलेही होते. ठकबाज आकाश हा सराफा व्यापारी आहे. चव्हाण निवृत्त झाले असून, ते संपूर्ण रक्कम बॅंकेत गुंतवत असल्याचे त्याला समजले. त्याने फिर्यादीला आकर्षक व्याजाचे आमिष दाखविले. बॅंकेत गुंतवणूक कराल तर असा किती व्याज मिळेल? मी तुम्हाला आकर्षक व्याज आणि हमीसुद्धा देतो, असे म्हणत त्याने चव्हाण यांचा विश्वास संपादन करून पैसे गुंतविण्यास भाग पाडले. 

सुरुवातीला चव्हाण यांनी एक लाख रुपये गुंतविले. त्यावर आकाशने परतावा म्हणून दरमहा 3 हजार रुपये परत करणे सुरू केले. त्यामुळे चव्हाण यांचा विश्‍वास वाढत गेला. त्यांनी हळूहळू गुंतवणुकीची रक्कम वाढविली. अशा प्रकारे आकाशने वेळोवेळी त्यांच्याकडून 37 लाख रुपये घेतले. नंतर मात्र तो कारण सांगू लागला. फ्लॅट, पैसे देतो, असे म्हणत तो दिवस ढकलत होता. त्याने गुंतवलेल्या रकमेपैकी 9 लाख 42 हजार रुपये परत केले. उर्वरित 27 लाख 58 हजार रुपये परत न करता चव्हाण यांची फसवणूक केली. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर येथे सहायक पोलिस निरीक्षक नाईक यांनी आरोपीविरुद्ध कलम 420 भादंविअन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने 10 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

हेही वाचा : प्राध्यापक करतोय शेतमजुरी; का आली अशी हलाखीची वेळ, वाचा... 

बालमैत्रिणीलाही गंडवले 
आकाश आणि मेघा हे दोघेही एकमेकांसोबत लहानाचे मोठे झाले. बालमैत्रीण असल्यामुळे मेघा हिचा आकाशवर खूप विश्‍वास होता. लग्नानंतर ती विदेशात राहायला गेली. आपल्या वडिलांच्या पैशाची छान गुंतवणूक करून पैसा कमवून दिल्याचे आकाशने मेघाला सांगितले. त्यामुळे तिचाही विश्‍वास बसला. मेघानेही आकाशकडे 7 लाख रुपये गुंतविले. मात्र, आकाशने बालमैत्रिणीला गंडा घातला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 lakh was seized