नागपूरचे 37 विद्यार्थी अडकले मलेशियात? प्रवासाचे साधन नाही, पैसेही आले संपत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

सोबत नेलेले पैसे संपत आल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अडचणीतून मार्ग निघावा यासाठी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाला संकेतस्थळावरून मदतीची विनंती केली आहे.

नागपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जग बंदीस्त झाले आहे. प्रवासाचे सर्वच मार्ग बंद असल्याने नागपूरकर 37 विद्यार्थी मलेशियात अडकले आहेत. मायदेशी परतण्यासाठी त्यांनी केंद्र व राज्य सरकारला विनवनी केली असून आहे त्याच स्थितीत मदतीची आस लावून बसले आहेत.
मलेशियात अडकलेले सर्वजण नागपूरच्या तिरपुडे कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टचे विद्यार्थी आहेत. ते केके कॅरिअर सोल्युशन्स या कन्स्टलटन्सिमार्फत मलेशियात सहा महिन्यांच्या विशेष प्रशिक्षणासाठी 29 फेब्रुवारीला पोहोचले. मलेशिया पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. यामुळे येथील प्रशिक्षणाला करियरच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. म्हणूनच विद्यार्थी "एक्‍सायडेट' होते. पण, प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वीच मलेशियात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आणि आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली.

स्थानिक नागरिकांना वाचविण्यासाठी बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना अटकाव घालणे आवश्‍यक होते. त्यानुसार 18 मार्चपासून मलेशिया लॉकडाऊन करण्यात आले. त्यासोबतच उद्योग, व्यावसायासह शैक्षणिक संस्थाही कुलुपबंद झाल्या. परिणामी नागपूरहून गेलेले विद्यार्थी इपोह आणि पेनॉन्ग आईजलॅण्ड येथे वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये अडकून पडले आहेत. ते दहा-दहाच्या संख्येत वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत. सर्वत्र लॉकडाऊन असल्याने दैनिक गरजांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करावा लागत आहे. खरेदीसाठी एकट्याच व्यक्तीला जावे लागते, शिवाय लांबचा प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थी चांगलेच चिंतेत आहेत.

सविस्तर वाचा - कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण म्हणतो मला बळजबरीने पकडून ठेवले आहे, सोशल मीडियावर केला व्हिडिओ व्हायरल

संकेतस्थळावरून मदतीची विनंती

सोबत नेलेले पैसे संपत आल्याने त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अडचणीतून मार्ग निघावा यासाठी विद्यार्थ्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाला संकेतस्थळावरून मदतीची विनंती केली आहे.
चीनपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रकोप आता जगभरात पसरला आहे. काही देशांमध्ये हजारोंच्या संख्येने रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. भारताने काही देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांना विशेष विमान पाठवून परत आणले. तशीच मदत आम्हालाही करावी. लॉकडाऊन आणखी किती दिवस वाढणार, याबाबत स्पष्टता नाही. अडचणीच्या या काळात शासनानेच मदत करावी, अशी विनवणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 37 students in Nagpur locked in Malaysia