विदर्भाने 37 वर्षांपूर्वी उदयपूरमध्ये केले होते राजस्थानचे गर्वहरण

सामना संपल्यावर व्यवस्थापक मधू साठे यांच्यासोबत मैदानाबाहेर येताना सुहास फडकर आणि भास्कर जोशी.
सामना संपल्यावर व्यवस्थापक मधू साठे यांच्यासोबत मैदानाबाहेर येताना सुहास फडकर आणि भास्कर जोशी.

नागपूर : गोलंदाजांच्या मेहनतीला फलंदाजांची साथ लाभल्यास काय घडू शकते, याचा उत्तम नमुना 37 वर्षांपूर्वी उदयपूर येथे पाहायला व अनुभवायला मिळाला. सुहास फडकर यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ रणजी संघाने त्या सामन्यात बलाढ्य राजस्थानवर तीन गड्यांनी थरारक विजय नोंदवून यजमानांचे गर्वहरण केले होते. सामना निकाली काढण्याच्या इराद्याने पत्करलेला धोका राजस्थानच्या चांगलाच अंगलट आला.


राजस्थान संघात कर्णधार पार्थसारथी शर्मा, कुलदीप माथूर, अष्टपैलू विनोद माथूर, पदम शास्त्री, संजू मुदकवी, सुरेश शास्त्री, दलबीरसिंग व प्रदीप सुंदरमसारखे दिग्गज खेळाडू असल्याने, या संघाला त्यांच्या मैदानावर पराभूत करणे त्या काळात फारच अवघड होते. मात्र, विपरीत परिस्थितीत विदर्भाच्या खेळाडूंनी एकजुटता दाखवत व्हीसीएच्या इतिहासातील अविस्मरणीय विजयाची नोंद केली. नोव्हेंबर 1983 मध्ये खेळल्या गेलेल्या तीनदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करणाऱ्या राजस्थानचा पहिला डाव चहापानापूर्वीच 155 धावांत गुंडाळल्या गेला. भास्कर जोशी व विकास गवते यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करून राजस्थानचा निर्णय साफ खोटा ठरविला. खेळपट्टी धोकादायक असल्याने त्यावर संयमाने खेळणे आवश्‍यक होते. विदर्भाच्या फलंदाजांनी नेमके तेच केले. सलामी जोडीचा अपवाद वगळता प्रत्येकाने योगदान दिल्याने विदर्भाला पहिल्या डावात 231 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

विदर्भाला 76 धावांची आघाडी मिळवून देण्यात कर्णधार फडकर यांची निर्णायक भूमिका राहिली. सातव्या स्थानावर फलंदाजीस आलेल्या फडकर यांनी सर्वाधिक 62 धावा ठोकल्या. मधल्या फळीतील सुनील हेडाऊ यांनी 39 व राजू पनकुले यांनी 29 धावा करून कर्णधाराला पुरेपूर साथ दिली. पहिल्या डावात माघारल्यानंतर बॅकफूटवर आलेल्या राजस्थानने विदर्भावर दडपण आणण्याच्या इराद्याने झटपट धावा गोळा करत दुसरा डाव 7 बाद 175 वर घोषित केला. "मॅटिन विकेट' आणि सुंदरमसारखा तुफान "मॅचविनर' असल्याने राजस्थानला विजयाची आशा होती. परंतु, वैदर्भी फलंदाजांनी त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ दिले नाही.

फडकर पुन्हा धावले मदतीला
चेंडू वरखाली (अनइव्हन बाउन्स) होणाऱ्या खेळपट्टीवर 174 धावांचे विजयी लक्ष्य निश्‍चितच सोपे नव्हते. सुरुवात डळमळीत झाल्यानंतर विजयाचा मार्ग आणखीनच कठीण झाला होता. अशा वेळी कर्णधाराकडून सर्वाधिक अपेक्षा केली जाते. फडकर यांनीही त्यांना निराश न करता नाबाद 45 धावांची "मॅचविनिंग' खेळी करत विदर्भाला तीन गड्यांनी रोमांचक विजय मिळवून दिला. फडकर यांना बाद करण्यासाठी राजस्थानने शर्थीचे प्रयत्न केले. पण, तो दिवस फडकर यांचाच होता. त्या दिवशी मधली फळी व "टेलेंडर'नेही त्यांना उत्तम साथ दिली. विशेषतः हेडाऊ (38 धावा) व पनकुले (36 धावा) यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. दोन्ही डावांत सर्वाधिक धावा काढणारे फडकर विदर्भासाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरले. त्यामुळेच राजस्थानवरील हा विजय आपल्या करिअरमधील सर्वोत्तम क्षण असल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानचे गर्वहरण करणाऱ्या त्या सामन्यात महान फलंदाज लाला अमरनाथ यांचे पुत्र राजिंदर अमरनाथ विदर्भाकडून व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com