धक्‍कादायक... "रेडीयन्ट'च्या कर्मचाऱ्यांकडून 39 लाखांची अफरातफर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जून 2020

सतीश कावळे, सुमित गजभिये व रोहित रमेश गणवीर अशी आरोपींची नावे आहेत. यातील रमेश गणवीर हा चेन्नईतील मुख्य कार्यालयात नियुक्त असून तो काही काळापूर्वी नागपुरात होता. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची नागपूरची असलेली रेडीयन्ट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी "कॅश पीकअप ऍण्ड डिलेव्हरी' क्षेत्रात कार्यरत आहे. नागपुरात सेंट्रल एव्हेन्यूवरील आंबेडकर चौकात कंपनीचे विभागीय कार्यालय आहे.

नागपूर : रेडीयन्ट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीच्या नागपूर शाखेतील तीन कर्मचाऱ्यांनी मिळून 39 लाखांची अफरातफर केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सतीश कावळे, सुमित गजभिये व रोहित रमेश गणवीर अशी आरोपींची नावे आहेत. यातील रमेश गणवीर हा चेन्नईतील मुख्य कार्यालयात नियुक्त असून तो काही काळापूर्वी नागपुरात होता. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळची नागपूरची असलेली रेडीयन्ट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस ही कंपनी "कॅश पीकअप ऍण्ड डिलेव्हरी' क्षेत्रात कार्यरत आहे. नागपुरात सेंट्रल एव्हेन्यूवरील आंबेडकर चौकात कंपनीचे विभागीय कार्यालय आहे.

कंपनीच्या नियमानुसर ग्राहकांकडून येणारी रक्कम कंपनीच्या कार्यालयातील व्होल्ट मध्येच ठेवावी लागते. दुसऱ्या दिवशी ती संबंधित बॅंकेत जमा केली जाते. कंपनीचे शिवाजी पाटील (50) रा. पुणे यांना व्होल्टमधील रकमेबाबत शंका आली. त्यांनी मुख्यालयामार्फत व्होल्टचे लाइव्ह सीसीटीव्ही फुटेज मागवून घेतले. परंतु, फुटेज पाठविणे टाळण्यात आले. शिवाजी पाटील यांनी स्वत: सतीश कावळे याला फोन केला असता त्याने सीसीटीव्हीचे डीव्हीआर खराब असल्याचे कारण पुढे केले. त्यांनी चौकशी केली असता व्होल्टमध्ये कॅश बरीच कमी असल्याचे समजले.

अवश्य वाचा- नातेच उठले जीवावर, शेतीच्या वादातून नातवानेच केली आजीची हत्या

यानंतर तिन्ही आरोपींशी चर्चा केली असता एक ते दीड वर्षापासून रोख रक्कम अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे कबूल केले. पाटील यांच्या सूचनेवरून नागपूर विभागाचे असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर गणेश पोकरकर यांच्याकरवी प्रत्यक्ष ऑडिट करविण्यात आले. व्होल्टमध्ये केवळ 2 लाख 2 हजार 26 रुपये मिळून आले. व्होल्टच्या कॅश मूव्हमेंट रजिस्टरप्रमाणे आरोपी सतीशने केलेल्या नोंदीप्रमाणे 41 लाख 4 हजार 639 रुपये शिल्लक असायला हवे होते. म्हणजेच एकूण 39 लाख 2 हजार 613 रुपयांची अफरातफर झाली आहे. ही बाब समोर येताच शिवाजी पाटील यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

दरोड्याच्या तयारीत असणारी टोळी जेरबंद

 एमआयडीसी पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे वानाडोंगरी परिसरातील संगमरोड स्मशान परिसरात धाड टाकून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीतील चार आरोपींना अटक केली. दीपक सुनील सिंग (26), मयूर किशोर चिपाटे (33) दोन्ही रा. भीमनगर, अभितोष कांबळे (25) रा. पारधीनगर, मुकेश शर्मा (28) रा. भीमनगर, अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पवन ऊर्फ किस्सी आणि आकाश सहारे दोन्ही रा. इंदिरा मातानगर हे दोघेही अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपींकडून तलवार, मोबाईल, नायलोन दोरी, मिरची पावडर आदी साहित्य जप्त करण्यात आले. दरोड्यासाठी वापरणार असलेली टाटा सफारीसुद्धा जप्त करण्यात आली आहे. दोन आरोपींचा शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 39 lakh rigging from Radiant's employees