खवय्यांनो, खात्री करून जेवणासाठी बाहेर पडा;  शहरातील ४० टक्के हॉटेल अद्याप बंदच

राजेश रामपूरकर 
Wednesday, 14 October 2020

राज्य शासनाने उपाहारगृह आणि हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत दिलेली आहे. व्यावसायिक प्रशासनाला मदत करीत आहे. मात्र, नऊपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची सक्ती केलेली आहे

नागपूर :  अनलॉकमध्ये हॉटेलचे जेवण करण्याचा बेत आखला असेल तर थोडे थांबा. कारण, शहरातील ४० टक्के हॉटेल अद्याप बंदच आहेत. त्यामुळे जेवणासाठी पहिली पसंती ठरत असलेले हॉटेल सुरू आहे का याची खात्री करा, मगच घराबाहेर पडा; अन्यथा बाहेरच्या जेवणाच्या आनंदावर विरजण पडू शकते. अनलॉकमध्ये शासनाने टाकलेले अनेक निर्बंध आणि हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडल्याने ही स्थिती निर्माण झालेली आहे.

राज्य शासनाने उपाहारगृह आणि हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी सकाळी दहा ते रात्री नऊपर्यंत दिलेली आहे. व्यावसायिक प्रशासनाला मदत करीत आहे. मात्र, नऊपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची सक्ती केलेली आहे. या वेळेत व्यवसाय करणे सोयीचे नसल्याने अनेकांनी पूर्ण क्षमतेने उपाहारगृह व हॉटेल सुरू केलेली नाहीत. 

एकाच वेळी निघाली दोघींची अंत्ययात्रा; एकीच्या नशिबी शेवटचे सोपस्कारही नाही

शिवाय, ग्राहकांना प्रवेश देण्यासंबंधीचे बंधनेही कायम आहेत. यामुळे व्यवसाय करण्यास अद्याप अनुकूल चित्र नाही, असे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. टाळेबंदीमुळे आधीचं आर्थिक अडचणीत सापडलेले हॉटेल व उपाहारगृह व्यावसायिक या अटीमुळे द्विधा मनःस्थितीत आहेत. त्यामुळे हॉटेलची वेळ रात्री १२पर्यंत करावी, अशी मागणी पुढे आलेली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिकही बाहेर जाऊन जेवणाचा आनंद लुटण्याचे टाळत आहेत. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेतली जात आहे. थर्मल स्कॅनिंग, ग्राहकांच्या नोंदी हॉटेल व्यावसायिकांकडून केले जात आहे. मात्र, सलग सहा महिन्यांच्या टाळेबंदीमुळे ग्राहकांच्या जवळील रोख रक्कम कमी झालेली आहे. त्यामुळे त्यांनीही खर्चावर निर्बंध आणले आहेत. त्याचाही फटका हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे, असेही हॉटेल संचालकांचे म्हणणे आहे.

नागपुरातही आहे 'आजीचा ढाबा', दहा रुपयात देते चार डोसा; गरजूंना आहे मदतीची गरज

शहरात दोन हजारांपेक्षा अधिक हॉटेल व उपाहारगृहे आहेत. कोरोना विषाणूची भीती अद्यापही ग्राहकांचा मनात घट्ट घर करून बसलेली आहे. त्यामुळे एकूण क्षमतेपेक्षा फक्त ३० ते ३५ टक्केच ग्राहक येत आहेत. हॉटेलसाठी लागणारी वीज देयक, कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर खर्चही निघणे कठीण झालेले आहे. ग्राहक ऑनलाइन ऑर्डरला प्राथमिकता देत असले तरी त्याची टक्केवारी अतिशय नगण्य आहे. हॉटेल सुरू जरी केले असले, तरी अद्याप त्यांच्या मनात अस्थिरतेचे वातावरण आहे.
-गणेश दवे, 
अध्यक्ष, नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 40 percent hotels in nagpur are still closed