नागपुरात 52 लाखांची निकृष्ट सुपारी जप्त 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जून 2020

सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरुन 24 हजार 498 किलोंचा साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 52 लाख 73 हजार 194 रुपये आहे. 

नागपूर : सुपारी हब म्हणून ओळख निर्माण केलेल्या नागपूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी अन्न व औषधी प्रशासन विभागाने सुपारीच्या गोदामावर छापा टाकून 52 लाखांचा साठा जप्त केला. विभागाने शुक्रवारी केलेल्या कारवाईत एक कोटीची सुपारी ताब्यात घेतल्याने खळबळ माजली असताना दुसऱ्या दिवशीही कारवाई केल्याने व्यावसायिकांना धक्का बसला आहे. 

शहरात निकृष्ट दर्जाची सुपारी विकल्या जात असल्याच्या माहितीवरून सुराबर्डी येथील मदन कॉम्प्लेक्‍स हायलॅंड पार्क रोड येथील विजयकुमार हरिश्‍चंद्र शुक्‍ला यांचे मालकीचे ए.व्ही.जे. लॉजिस्टिक लिमिटेड या प्रतिष्ठानांच्या गोदामावर अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. दरम्यान, गोदामाची तपासणी केली असता तेथील सुपारीचे नमुने घेण्यात आले. सदर सुपारी निकृष्ट दर्जाची असल्याच्या संशयावरुन 24 हजार 498 किलोंचा साठा जप्त केला. त्याची अंदाजे किंमत 52 लाख 73 हजार 194 रुपये आहे. 

हेही वाचा : पतीसोबत अश्‍लील वर्तन करण्यास बाध्य केले; नंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी 

अन्न व औषधी प्रशासनाने मागील वर्षात सुपारीचे 38 नमुने विश्‍लेषणासाठी घेत एकूण 5 लाख 32 हजार 600 किलो सुपारी जप्त केली. त्याची किंमत अंदाजे दहा कोटी 50 लाख 46 हजार 977 रुपये आहे. यावर्षीही एप्रिल व मे या दोन महिन्यात आठ ठिकाणी छापे टाकून 39 हजार 379 किलो सुपारी ताब्यात घेतली. त्याची किंमत 95 लाख 38 हजार 945 रुपये आहे. अन्न व औषधी प्रशासनाने वेळोवेळी मोहीम राबवून कारवाई केली आहे. संपूर्ण कारवाई अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहआयुक्त चं. भा. पवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 52 lakh betel nuts seized