बीएसएनएलचे 545 कर्मचारी होणार निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 जानेवारी 2020

देशभरात सध्या बीएसएनएलमध्ये 1 लाख 56 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 1 लाख 6 हजार कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. यापैकी 78 हजार 596 कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारत घरी बसण्याचा पर्याय स्वीकारला आहे. तर, इतरांनी कंपनीच्या नियमानुसार बदली दिलेल्या स्थळी कामाची जबाबदारी स्वीकारली आहे.

नागपूर : आर्थिक चणचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)ने कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. निवृत्ती स्वीकारा; अन्यथा इतरत्र बदली स्वीकारा, असा फतवा काढल्याने देशभरात 78 हजार 596 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छाबदलीसाठी अर्ज केले आहेत. नागपूर विभागात 545 कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारली असून, 31 जानेवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांना सेवेतून निवृत्ती देण्यात येणार आहे.
देशभरात सध्या बीएसएनएलमध्ये 1 लाख 56 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी 1 लाख 6 हजार कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. यापैकी 78 हजार 596 कर्मचाऱ्यांनी निवृत्ती स्वीकारत घरी बसण्याचा पर्याय स्वीकारला आहे. तर, इतरांनी कंपनीच्या नियमानुसार बदली दिलेल्या स्थळी कामाची जबाबदारी स्वीकारली आहे. 1 फेब्रुवारी 2020 पासून बदलीस्थळी कर्मचाऱ्यांना रुजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. निवृत्ती स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च 2020 पर्यंत 50 टक्के रक्कम आणि त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात उर्वरित रक्कम अदा करण्यात येणार आहे. बीएसएनएलला कर्मचाऱ्यांना तब्बल 15 हजार कोटी रुपये वाटप करायचे आहेत.

सविस्तर वाचा - पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले, प्रत्येक शेतकरी कुटुंबाला संरक्षण

स्वेच्छानिवृत्ती योजनेचे स्वरूप
वयाची 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणाऱ्या रकमेत 25 टक्के अधिक लाभ मिळणार आहे. हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा पाच हप्त्यांत विभागून मिळणार आहे. सेवेत कार्यरत वर्षांच्या 35 दिवसांइतकी आणि शिल्लक राहिलेल्या सेवेच्या वर्षांतील 25 दिवसांच्या वेतनाइतकी रक्कम (निवृत्तिवेतन वगळून) सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे वय 56 वर्षे असेल, त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा 40 महिन्यांचे वेतन मिळणार आहे. पेन्शन व रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार आहेत.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 545 employees of Nagpur BSNL will be retired on 31st Jan.