वयवर्षं ८० तरीही कौतुक करावं तेवढं कमी! ज्येष्ठ महिलेने साकारली आकर्षक पर्णचित्रे; २० वर्षांपासून जपलाय छंद

80 years old woman doing paintings using leaves of trees in Nagpur
80 years old woman doing paintings using leaves of trees in Nagpur

नागपूर : म्हातारपण म्हणजे आयुष्यातील सर्वात कठीण काळ. या दिवसांमध्ये एकेक दिवस काढणे खूप जड जाते. त्यामुळे स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक वेगवेगळे छंद जोपासतात. समर्थनगर येथील निश्चिंता गोखले या अशाच ज्येष्ठांपैकी एक. त्यांनी टाकाऊ पर्णचित्रांपासून आकर्षक वस्तू तयार करून वेळेचा सदुपयोग तर केलाच, शिवाय त्या मोबदल्यात मिळणाऱ्या चार-दोन पैशातून मतिमंद संस्थांच्या मुलांना आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकीही जपली.

ऐंशी वर्षांच्या निश्चिंता गोखले या उत्तम चित्रकार असून, निसर्गचित्रे काढणे त्यांचा छंद आहे. फावल्या वेळेचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी २० वर्षांपूर्वी पर्णचित्रे काढायला सुरूवात केली. निसर्गसौंदर्याने नटलेल्या विदर्भातील ठिकठिकाणच्या जंगल व गार्डनमधून हिरवी पाने व फुले जमा करतात. ती पाने व फुले सुकवून फेविकॉल व ब्रशच्या मदतीने पांढऱ्या कागदावर आकर्षक रेखीव चित्रे रेखाटतात. 

या कामात त्यांना डाऊन सिंड्रोम आजाराने ग्रस्त मुलगा अविनाशही मदत करतो. निश्चिंता यांनी आतापर्यंत पर्णचित्राद्वारे डिझाईनदार निसर्गचित्रे, भेटकार्ड, संदेशकार्ड, गिफ्ट पॅक, लिफाफे, बुके, पशूपक्षांची चित्रे, कोलाज, फोटोफ्रेम्स व अन्य वस्तू तयार केल्या आहेत. मुळात हौशी चित्रकार असलेल्या निश्चिंता यांनी हार्डबोर्डवर सुंदर पेंटिंग्जही चितारल्या आहेत. त्यांनी गेल्या २० वर्षांत जवळपास पाच हजारांवर चित्रे काढली आहेत.

त्यांच्या या वस्तू राज्यभरातील विविध ठिकाणच्या प्रदर्शनांमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येतात. पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये दरवर्षी आयोजित फ्लॉवर शोमध्ये त्यांचा हमखास स्टॉल असतो. मुंबईच्या इंद्रधनू संस्थेच्या प्रदर्शनातही त्या नियमितपणे सहभागी होतात. याशिवाय नागपूर गार्डन क्लब, इनरव्हील क्लब, कुसुमताई वानखेडे हॉल व अन्य प्रदर्शनांमध्ये त्यांच्या वस्तूंचा स्टॉल असतो. त्यांच्या कलेची अनेक जण स्तुती करून वस्तू खरेदी करतात. या माध्यमातून मिळणारी काही रक्कम त्या स्वीकार या मतिमंद मुलांची संस्थेला देतात. 

निश्चिंता म्हणतात, पैसे कमावणे हा माझा उद्देश नाही. या निमित्ताने मुलाला व स्वतःला बिझी ठेवण्यासोबतच या माध्यमातून मिळणाऱ्या पैशातून का होईना माझ्या हातून समाजसेवा घडते आहे, याचे अधिक समाधान आहे. तब्येत साथ देईपर्यंत हा छंद व समाजसेवा सुरू ठेवणार असल्याचे निश्चिंता यांनी सांगितले. या कलेबद्दल त्यांना मानसन्मान व अनेक पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com