
नागपूर : सरकारने विडीवर 28 टक्के वस्तू व सेवा कर लावल्याने त्याचा फटका तेंदूपत्ता व्यवसायाला बसू लागला आहे. चौथ्या फेरीनंतरही यंदा राज्यातील 279 पैकी फक्त 88 युनिटचाच लिलाव झाला आहे. अद्यापही 191 युनिटची विक्री शिल्लक आहे. परिणामी ग्रामीण भागातील मजुरांच्या हक्काची मजुरी कमी होण्याची शक्यता बळावली आहे. चार वर्षांपासून तेंदूपत्त्याची मागणी कमी होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
अवश्य वाचा - शेतक-यांनो तुम्हाला सोडणार नाही! मी पुन्हा येईन...
तेंदूपत्ता लिलावातून राज्य शासनासह मजुरांना बोनस आणि मजुरी प्राप्त होते. राज्यातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, बीड, हिंगोली, औरंगाबाद, परभणी, नांदेड, अमरावती या परिसराला लागून मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलांमध्ये तेंदूच्या झाडांची संख्या अधिक असून वन विभागातर्फे दरवर्षी तेंदूपत्ता युनिटचा लिलाव केला जातो. यातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो.
तेंदूपत्ता तोडणीसाठी मजुरांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. उन्हाळ्यात शेतीची फारशी कामे राहत नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांची रोजगाराच्या शोधात भटकंती सुरू होते. मात्र, या मजुरांना तेंदूपत्ता हंगामामुळे मोठी मदत होत असते. त्यामुळे मजुरांचे अख्खे कुटुंब या कामात व्यस्त असतात. तेंदूपत्ता मजुरांना बोनसदेखील दिला जातो. मात्र, यंदा राज्यातील विविध भागांतील तेंदूपत्ता युनिटचा लिलावच झाला नाही. मागील वर्षीनुसारच यंदा तेंदूपत्ता युनिट लिलावाचे दर आहेत. तरीही लिलाव होत नसल्याने या विभागाची चिंता वाढली आहे.
महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकूण 279 तेंदूपत्ता युनिट आहे. या युनिटमधून तेंदूपत्त्याची विक्री केली जाते. मात्र, यंदा चौथ्या फेरीमध्ये 88 युनिटचा लिलाव झालेला आहे. त्यामुळे वन विभागाकडून तेंदूपत्ता लिलावासाठी पाचवी फेरी सहा ते 12 मार्चदरम्यान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
तेंदूपत्त्यापासून विडी तयार केली जाते. विडी तयार करण्यासाठी तंबाखूचा वापर केला जातो. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची शक्यता अधिक राहते. त्यामुळे काही तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध घातले आहेत. तर काही पदार्थांवर विविध प्रकारचे कर आकारून त्यांची किंमत वाढवून त्यांचे सेवन कमी होईल, असा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. विडीसाठी वापरल्या जाणाऱ्या तंबाखूही महाग करण्यात आला आहे. पर्यायाने विडी महाग होऊन त्याचे सेवन दरवर्षी घटत चालले आहे. विडीचा वापर प्रामुख्याने राजस्थान, बिहार, गुजरात आदी राज्यांमधील नागरिक करतात. मात्र, शासनाच्या जनजागृतीनंतर विडीचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी तेंदूपत्त्याची मागणी दरवर्षी घटत चालली आहे. मागील वर्षी कंत्राटदारांनी तेंदूपत्त्याला अल्प प्रतिसाद दिला होता. मात्र, बाजारात उठाव नसल्याने तेंदूपत्त्याची विक्रीच कमी झालेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.