महिला, बालकल्याण विभागात बदल्यांचा घोळ, काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

नीलेश डोये
Monday, 31 August 2020

बदल्यांची फाईल अध्यक्षा आणि सभापती यांच्या कार्यालयात फिरत असून, यात एका महिला अधिकाऱ्याची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. सरकारने जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रथम ३१ जुलैपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली.

नागपूर  : जिल्हा परिषदेची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न सीईओ योगेश कुंभेजकरांचा असताना दुसरीकडे येथील घोळ, गैरव्यवहार काही कमी होताना दिसत नाही. शिक्षण आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रकरण ताजे असताना आता महिला, बालकल्याण विभागाचा नवा प्रताप समोर आला आहे. वेळ संपल्यानंतरही येथे बदल्या करण्यात येत आहे. यासाठी सर्व व्यवहार मागच्या तारखेत करण्याचा खटाटोप अधिकाऱ्यांनी चालवला आहे.

यात मोठे अर्थकारण असल्याचे सांगण्यात येते. बदल्यांची फाईल अध्यक्षा आणि सभापती यांच्या कार्यालयात फिरत असून, यात एका महिला अधिकाऱ्याची महत्वाची भूमिका असल्याची चर्चा आहे. सरकारने जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या प्रथम ३१ जुलैपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ही मुदत १० ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली.

नियमित व प्रशासकीय बदलीनंतर आपसी बदल्या करायच्या होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महिला, बालकल्याण विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने हिंगणा येथे आपसी बदली करायची होती. परंतु हिंगणा येथील महिला कर्मचाऱ्याची इतरत्र प्रशासकीच बदली झाली. त्यामुळे त्यांनी कळमेश्वर येथील अधिकाऱ्याशी आपसी बदलीचा प्रस्ताव दिला. 

जाणून घ्या - नागपूरकरांनो सावधान! घराबाहेर जाणार असाल तर जरा थांबा.. 'ते' ठेऊन आहेत वाईट नजर
 

हा प्रस्ताव बदली तारखेच्या अंतिम टप्प्यात दिला. विशेष म्हणजे एकाच दिवशी विभागाकडून प्रस्ताव तयार करून सामान्य विभागामार्फत सीईओंकडे पाठविण्यात आला. सीईओंनी फाईल अभिप्रायसाठी सभापती व अध्यक्षाकडे पाठविली.

यात बदलीचा वेळ निघून गेला. असे असतानाही बदलीची प्रक्रिया कायम आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला कर्मचाऱ्याने अध्यक्षा व महिला, बालकल्याण सभापती यांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येते. या भेटीमुळेच बदलीची फाईल प्रक्रियेत असल्याची चर्चा आहे.

ही फाईल अध्यक्षा व सभापती यांच्याकडे कार्यालयाकडे फिरत असल्याचे सांगण्यात येते. यात एका महिला अधिकारीही दोन्ही महिला पदाधिकाऱ्याकडे चकरा मारत असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार एका सभापतीचा या बदलीला विरोध असल्याचे सांगण्यात येते. यासाठी सर्व व्यवहार मागच्या तारखेत दाखविण्यात येणार आहे. विभागातील अधिकाऱ्याकडून यासाठी मोठी तत्परता दाखविण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता सीईओ यावर काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Abuse in Nagpur Zilla Parishad Women, Child Welfare Department