कोरोना ब्रेकिंग : अपघातात दगावलेला तरुणही बाधित, मृतांची संख्या 24 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

रविवारी कोरोनाच्या नकाशावर नागपुरातील शेषनगर, नरेंद्रनगर येथील दत्त कॉलनी, दिघोरी येथील रामेश्‍वरनगर आले आहे. या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नागपूर : मूळचा राजस्थानच्या भिकर येथील रहिवासी असलेल्या 24 वर्षीय युवकाचा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. डॉक्‍टरांनी तपासताच त्याला मृत घोषित केले. मृताची कोरोना चाचणी सक्‍तीची असल्याने नमुने घेण्यात आले. मृत युवक कोरोनाबाधित आढळला. अपघाती मृत्यू आलेल्या तरुण बाधित आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या मृत्यूमुळे उपराजधानीतील कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या आता 24 वर पोहचली. 

रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत 27 ने भर पडल्याने बाधितांचा आकडाही 1450 वर पोहचला. विशेष असे की, रविवारी कोरोनाच्या नकाशावर नागपुरातील शेषनगर, नरेंद्रनगर येथील दत्त कॉलनी, दिघोरी येथील रामेश्‍वरनगर आले आहे. या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्री साडेदहाच्या दरम्यान अपघात झाला. पोलिस घटनास्थळी पोहचले. यावेळी 24 वर्षाचा युवक गंभीर जखमी अवस्थेत दिसला. 

असे का घडले? - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत
 

पोलिसांनी तत्काळ मेयोत उपचारासाठी आणले. परंतु तो रस्त्यातच दगावला. मेयोतील डॉक्‍टरांनी तपासणी केली असता, घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या युवकाचा नाव-पत्ता काहीच माहिती नव्हते. अनोळखी अशी नोंद करण्यापूर्वी या प्रेताचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी मृताच्या खिशात ऑनलाइन काढलेले रेल्वेचे तिकीट असल्याने ओळख पटली. राजस्थानमधील युवक असल्याचे निष्पन्न झाले. 

उपराजधानीत रविवारी (ता.28) आढळून आलेल्या कोरोनाबाधितांमध्ये शेषनगर, नरेंद्रनगर येथील दत्त कॉलनी, एनआयटी उद्यान परिसर, नाईक तलाव, बांगलादेश, दिघोरी, कामठी, मिनीमातानगर, भीमनगर येथील रुग्ण आहेत. याशिवाय एका विलगीकरण कक्षात सेवा देणाऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. तर एकाच दिवशी आणखी मोमीनपुरा येथील 5 जणांचा अहवाल बाधित आल्यामुळे पुन्हा मोमीनपुरा येथे उद्रेकजन्य स्थिती येऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली. 

मोमीनपुरा, नाईक तलाव-बांगला देश, सतरंजीपुरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. यानंतर हिंगणा येथेही मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय चंद्रमणीनगर, वाडी, भानखेडा, टिमकी या भागातही मोठ्या प्रमाणात बाधित आढळले आहेत. कामठीतील मिलिटरी हॉस्पिटलमधील सैनिकासह चार जण बाधित आढळून आले आहेत. 

एकाच दिवशी 69 जणांची मात 

शहरात कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यापेक्षा जास्त संख्येत उपचारातून बरे होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या आहे. रविवारी मेडिकलमधून 50 तर एम्समधून 13 कोरोनाबाधितांसह मेडिकलमधून 6 अशा एकूण 69 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उपराजधानीत 11 मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर 30 एप्रिल रोजी शहरात केवळ 139 रुग्ण होते. आता हा आकडा 1450 वर पोहचला. यापैकी 1147 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोरोना अपडेट 

  • कोरोनाच्या बाधेने दगावलेल्यांची संख्या 24 
  • कोरोनाबाधितांची बाधितांची संख्या पोहचली 1450 
  • शेषनगर, भीमनगर, दत्त कॉलनी, रामेश्‍वरनगर या नवीन वस्त्यांमध्ये कोरोना शिरला 
  • औरंगाबाद प्रवासाची पार्श्‍वभूमी असलेल्या वैद्यकीय अधिकारी कोरोनाबाधित 
  • कामठीच्या मिलिटरी हॉस्पिटलमधील सैनिकाला बाधा 
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental death young man corona positive