पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत 

संदीप रायपुरे
Monday, 22 June 2020

गोंडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह चंद्रपूर येथील किशोर खाटिक यांच्याशी 19 मार्च रोजी संपन्न झाला. किशोर चंद्रपुरातील आरटीओ कार्यालयात वाहनचालक प्रशिक्षण केंद्रात मानधन तत्त्वावर काम करीत होता.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : तीन महिन्यांच्या गर्भवतीचा विहिरीत मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी सायंकाळी गोंडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी येथे उघडकीस आली. मृत गर्भवती महिलेवर आज अंत्यसंस्कार आटोपून नातेवाईक परतत असताना पतीने पत्नीच्या जळत्या चितेवर उडी घेतली. मानवी मनाला हादरवून सोडणारी ही धक्कादायक घटना सोमवारी चार वाजता भंगाराम तळोधीत घडली. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्‍यातील भंगाराम तळोधी येथील रूचिता चिट्टावार हिचा विवाह चंद्रपूर येथील किशोर खाटिक यांच्याशी 19 मार्च रोजी संपन्न झाला. किशोर चंद्रपुरातील आरटीओ कार्यालयात वाहनचालक प्रशिक्षण केंद्रात मानधन तत्त्वावर काम करीत होता. विवाहानंतर रूचिता तीन महिन्यांची गर्भवती होती. चार दिवसांपूर्वी ती भंगाराम तळोधी येथे माहेरी आली होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास तिचा मृतदेह गावालगत विहिरीत आढळून आला होता. यामुळे दोन्हीकडील कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. 

चंद्रपुरात शवविच्छेदन झाल्यानंतर आज रूचितावर भंगाराम तळोधी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रूचिताच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची क्रिया पूर्ण करून नातेवाईक व तिचा पती किशोर घराकडे परतत असताना काही अंतर पार केल्यावर मागे वळून किशोर पुन्हा स्मशानभूमीकडे धावत निघाला. कुणाला काही कळायच्या आता त्याने रूचिताच्या धगधगत्या चितेवर उडी घेतली. 

महत्त्वाची बातमी - शिक्षकांसाठी शाळा २६ पासूनच, या शाळेतील शिक्षकांना आदेश

किशोरच्या मागून धावत येणाऱ्या नातेवाईकांनी हा प्रकार पाहताच किशोरला वाचविण्यासाठी धाव घेतली. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता नातेवाईकांनी किशोरल्या जळच्या चितेतून उचलले. परंतु पत्नी गेल्याने आपल्या आयुष्यात आता काहीच उरले नाही, या भावनेने किशोरने काही कळायच्या आतच जवळच्या विहिरीत उडी घेतली. 

तरीही नातेवाईकांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. लगेच विहिरीत दोर सोडला, परंतु पत्नी नसल्याने आपल्या आयुष्यात काहीच उरले नाही, या एकाच विचारात असलेल्या किशोरने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर विहिरीत बुडून त्याचा मृत्यू झाला. गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांना माहिती कळताच ते चमूसह घटनास्थळी दाखल झाले. पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने अशा पद्धतीने आपला जीव दिल्याने यामागे नेमक कारण काय याचा तपास आता पोलिस करीत आहेत. 

परिसरात हळहळ

पत्नीची चिता जळत असताना पतीने सरणावर उडी घेत आपला जीव दिला, या घटनेची माहिती कळताच परिसरात खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेत माहिती जाणून घेतली. 

असेही दुर्दैव 

रूचिताची आई अपंग आहे. तिला वडीलही नाहीत. अशा स्थितीत तिच्या मामांनी तिच्या विवाहाची जबाबदारी पार पाडली. पण, अचानकपणे घडलेल्या या दुर्दैवी घटनेने आईसह मामाने हंबरडा फोडला. 

कारण काय?

 रविवारी रूचिताचा मृतदेह विहिरीत आढळला. यानंतर आज तिच्या पतीने चक्क जळत्या चितेवर उडी घेत आपला जीव दिला. या घटनांमागे नेमके कारण काय, हा प्रश्‍न आता समोर येत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पटले करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The husband jumped on his wife's pyre and set himself on fire