बाल्या बिनेकर हत्याकांडातील आरोपींना अटक, 19 वर्षांपूर्वी झालेल्या बापाच्या हत्येचा घेतला बदला

अनिल कांबळे
Sunday, 27 September 2020

शनिवारी दुपारी चार वाजता भोले पेट्रोल पम्पजवळील सिग्नलवर चेतनने आपल्या सहा साथीदारांसह बाल्याला अडविले. त्याच्यावर आरोपींनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने गोळी चालली नाही. आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून बाल्या बिनेकरचा खून केला.

नागपूर : उपराजधानीतील चर्चित बाल्या बिनेकर हत्याकांडातील चार आरोपींना गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली. अद्याप एक आरोपी फरार आहे. मुख्य आरोपी चेतन सुनील हजारे(३०, रजत राजा तांबे (२२), आसिम विजय लुडेरकर (२८)तिघेही राहणार इमामवाडा आणि  भरत राजेंद्र पंडित (२२, इंदिरानगर, जाततरोडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी तिघांना रामटेक परिसरातून, तर एकाला नागपुरातून अटक केली आहे. अनिकेत उर्फ अभिषेक (रा. झिंगाबाई टाकळी), असे फरार आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - नागपूरात दिवसाढवळ्या गॅंगवार!

मुख्य आरोपी चेतन हजारे याचे वडील सुनील हजारेचा २००१ मध्ये बाल्या बिनेकरने खून केला होता. त्यावेळी चेतन हा केवळ १५ वर्षाचा होता. काही वर्षातच चेतन हा गुन्हेगारी जगतात आला. त्याने जम बसविताच बाल्याचा खून करून बापाच्या हत्याकांडाचा बदला घेण्याचे ठरविले होते. त्यासाठी तो गेल्या काही महिण्यापासून बाल्याची रेकी करीत होता. शेवटी त्याला संपविण्यासाठी शनिवार दिवस ठरविला. शनिवारी दुपारी चार वाजता भोले पेट्रोल पम्पजवळील सिग्नलवर चेतनने आपल्या सहा साथीदारांसह बाल्याला अडविले. त्याच्यावर आरोपींनी पिस्तूलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तूल जाम झाल्याने गोळी चालली नाही. त्यामुळे घटनास्थळावर माऊजरची मॅगजीन पडली होती. आरोपींनी धारदार शस्त्राने सपासप वार करून बाल्या बिनेकरचा खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - आरोग्यपथके पोहोचली गाव, पाडे, तांडे, वस्त्यात...

हत्याकांडानंतर दोन तासातच गुन्हे शाखेचे युनिट क्र. १ चे पोलिस निरीक्षक संतोष खांडेकर, हवालदार प्रकाश वानखडे, दत्ता बागूल, नरेश सहारे, आशिष देवरे, अरूण चहांदे, राहूल इंगोले आणि मंगेश मडावी यांनी हत्याकांडातील आरोपी आसिम विजय लुडेरकर या आरोपीला अटक केली. त्याला खाक्या दाखवताच त्याने अन्य आरोपींची नावे सांगितली. त्यानंतर गुन्हे शाखेने मुख्य आरोपीसह तीन आरोपींना अटक केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: accused arrested in balya binekar murder case in nagpur