बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणी गाडे, गायकवाडला नऊपर्यंत पोलिस कोठडी

नरेंद्र चोरे
Wednesday, 4 November 2020

तपास अधिकारी पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांनी दोघांनाही आज न्यायालयात हजर करून अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता न्यायालयाने त्यांना नऊ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली.

नागपूर : बनावट क्रीडा प्रमाणपत्र प्रकरणातील मुख्य सूत्रधार अहमदनगरचे रमेश गाडे व बबन गायकवाड यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेत असलेल्या औरंगाबादच्या अंकुश राठोडचाही पीसीआर सहापर्यंत वाढविण्यात आला आहे. 

या प्रकरणात गाडे व गायकवाडला मानकापूर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच अहमदनगर जिल्ह्यातून अटक करून नागपुरात आणले होते. तपास अधिकारी पोलिस निरिक्षक कृष्णा शिंदे यांनी दोघांनाही आज न्यायालयात हजर करून अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीची मागणी केली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता न्यायालयाने त्यांना नऊ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अंकुश राठोडच्याही कोठडीतही दोन दिवसांची वाढ करण्यात आली. पोलिस तपासात त्यांच्याकडून त्यांच्याकडून महत्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. 

 

हेही वाचा : *माजी उपसंचालक व क्रीडा अधिकाऱ्याने बनवले नातेवाइकांचे बोगस प्रमाणपत्र !*

 

गाडे हा राहुरी कृषी विद्यापीठामध्ये चतूर्थ श्रेणी कर्मचारी असून, बबनचीही या घोटाळ्यात महत्वपूर्ण भूमिका असल्याची माहिती आहे. अंकुश, पांडुरंग बारगजे, पंतगे आणि बीडचा कृष्णा जायभाये हे या टोळीतील सक्रिय सदस्य होते. राज्यभर गाजत असलेल्या बनावट प्रमाणपत्र प्रकरणात मानकापूर पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यात अंकुश, भाऊसाहेब बांगर, रवींद्र व संजय या सांगलीच्या सावंत बंधूंसह माजी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांचा समावेश आहे. यातील चौघे जण सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहेत. आणखी काही सूत्रधार फरार असून, त्यांचाही शोध घेतला जात आहे. दैनिक 'सकाळ' ने हे गंभीर प्रकरण उचलून धरले आहे.  

संपादन : नरेश शेळके 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accused in Police Custody in Fake Sports Certificate Case