मोकळ्या भूखडांवरील कारवाईची ब्याद सभागृहाकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

शहरातील मोकळे भूखंडांनी स्वच्छतेला ग्रहण लावले असून ते जप्त करून लिलाव करण्याबाबत प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला. नोटीस देऊनही स्वच्छता न केल्यास भूखंडमालकावर प्रतिचौरस फूट 50 रुपये दंड आकारण्याचेही प्रस्तावित आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहे.

नागपूर : मोकळ्या भूखंडांवरील कचऱ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येत असल्याने त्यावर कारवाईसाठी प्रशासनाने प्रस्ताव तयार करीत स्थायी समितीकडे पाठविला. मात्र, भूखंड जप्तीनंतर लिलावाच्या प्रक्रियेसाठी धोरण ठरविण्याबाबत स्थायी समितीने हा प्रस्ताव सभागृहाकडे पाठवून हात झटकले.

ब्रेकिंग - आता लवकरच पॉर्नवर येणार निर्बंध

शहरातील मोकळे भूखंडांनी स्वच्छतेला ग्रहण लावले असून ते जप्त करून लिलाव करण्याबाबत प्रस्ताव महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयार केला. नोटीस देऊनही स्वच्छता न केल्यास भूखंडमालकावर प्रतिचौरस फूट 50 रुपये दंड आकारण्याचेही प्रस्तावित आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणात झुडपं वाढली आहे. या भूखंडांवर कचरा जमा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. मोकळ्या भूखंडांवर कचऱ्यामुळे दुर्गंधी वाढत असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, आतापर्यंत महापालिकेकडे मोकळ्या भूखंडांवर कारवाईबाबत कुठलेही धोरण नसल्याने मोकळे भूखंडमालकही मस्तवाल झाले होते.

याशिवाय शहरात अनेक भूखंडांच्या मालकांचाही पत्ता नाही. त्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता या सर्व बाबीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने तोडगा काढत प्रस्ताव तयार केला. आज स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली. भूखंड जप्तीनंतर लिलावाची प्रक्रिया करण्याबाबत राज्य शासनाने मागील वर्षी काढलेल्या जीआरमध्येही उल्लेख नाही. त्यामुळे याबाबत ठरविणे गरजेचे असल्याचे नमूद करीत हा प्रस्ताव स्थायी समितीने सभागृहाकडे पाठविला. आता सभागृहात मोकळे भूखंड लिलावाबाबत चर्चा झाल्यानंतर धोरण ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, भूखंडांच्या मालकांची माहिती असल्यास सर्वप्रथम त्याला दोन दिवसांत स्वच्छता करण्याबाबत नोटीस देण्यात येणार आहे. दोन दिवसांत स्वच्छता न केल्यास महापालिका भूखंड स्वच्छ करणार असून मालकांकडून प्रतिचौरस मीटर 50 रुपये दंड आकारण्याचेही प्रस्तावित आहे.

आणखी लावणार सात हजार एलईडी

महापालिकेने झोननिहाय एलईडी पथदिवे लावण्याचे कंत्राट दिले आहे. आतापर्यंत 1 लाख 39 हजार 993 एलईडी पथदिवे लावण्यात आले. आता दिवेविरहित खांबावर सात हजार अधिकचे एलईडी दिवे लावण्यात येणार आहे. आज स्थायी समितीने सात हजार दिवे लावण्यास मंजुरी दिली. यानंतर विविध कंपन्यांना दिलेले कंत्राटाचा कालावधी संपुष्टात येणार आहे. भविष्यात दुसऱ्या कंपन्यांना नियुक्त करण्यात येईल, असे स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी नमूद केले.

शहरात आतापर्यंत अडीचशे झाडे

वृक्षसंवर्धन आणि सुरक्षेसाठी सेल्फ वॉटरिंग सिस्टीमद्वारे शहरामध्ये दरवर्षी 11 हजार झाडे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे एखाद्या रोडवर कोणत्याही एकाच प्रजातीच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. आतापर्यंत अडीचशे झाडे लावण्यात आल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग व दहाही झोनमधून झाडे लावण्याबाबत नाहरकत मागविण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी नमूद केल्याचे पोहाणे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Action on open plots to the House