पॉलिटेकनिकसह फार्मसी प्रवेशाची नोंदणी सुरू; मागासवर्गीय ४०, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांवर प्रवेश

मंगेश गोमासे
Saturday, 10 October 2020

राज्यात पॉलिटेकनिक आणि फार्मसीच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी सुरू आहे. यासाठी इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्केची अट ठेवण्यात आली होती.

नागपूर : राज्यात पॉलिटेकनिक, फार्मसी पदविका प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. या अभ्यासक्रमात इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता ४० टक्के, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांवर प्रवेश मिळणार आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राजपत्र काढले आहे. 

हेही वाचा - कोरोना – एक विदारक अनुभव; कोरोनावर मात केलेल्या एका कर्तव्याप्रिय गृहिणीचे मनोगत   

राज्यात पॉलिटेकनिक आणि फार्मसीच्या पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश नोंदणी सुरू आहे. यासाठी इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ५० टक्केची अट ठेवण्यात आली होती. मात्र, या प्रकाराने बरेच विद्यार्थी पॉलिटेकनिकऐवजी पदवी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेत होते. दुसरीकडे  ४० टक्क्यांवर प्रवेश मिळत नसल्याने अनेकदा मुले तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशासाठी मुकत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयातील संचालकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी यावर लवकर निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. यातूनच या अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी विभागाने राजपत्र काढून इतर मागासवर्गीय आणि विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४०, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्क्यांवर प्रवेश देण्याची घोषणा केली. याबाबत संचालक डॉ. अभय वाघ यांना विचारणा केली असता त्यांनी याला दुजोरा दिला. या निर्णयामुळे पॉलिटेकनिक, फार्मसी पदविका प्रवेशाची नोंदणी वाढण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: admissions starts for pharmacy and polytechnic