कोरोना – एक विदारक अनुभव; कोरोनावर मात केलेल्या एका कर्तव्याप्रिय गृहिणीचे मनोगत   

read the experience of a house wife whose family was corona positive
read the experience of a house wife whose family was corona positive

नागपूर : मी व माझे कुटुंब आणि आम्ही केलेली कोरोनावरील मात या सर्वाचा स्वानुभव कथन मी करणार आहे. दैनंदिनीतील काही दगदगीच्या, धावपळीच्या कामानिमित्त काळ गेला तसे एक दिवस अचानक अंगदुखी सुरू झाली. लगेच अंगात बारीक ज्वर वाढू लागला. सुरुवात माझ्यापासून झाली होती. आतापर्यंत फक्त ज्वर्, अंगदुखी होती .दगदगीमुळे असावं हा समज गैरसमज केव्हाच बदलला जेव्हा 5 दिवसानंतर खूप थकवा जाणून अचानक तोंडाची चव व वास हे दोन्ही इंद्रियांनी काम करणे बंद केले. कशासाठी? पोटासाठी एवढेच काय ते अन्न भक्षण चालू होते. 

आतापावेतो कोरोनाची लक्षणे पाठ झाली असल्याने मी स्वतःला आयसोलेटेड केलेलेच होते. घरातील जेष्ठ माझ्या सासूबाई( वय 81 ) ,त्यांची फरफट पाहावत नव्हती, परंतु मुक गिळून बसायला व माणुसकीहीन जगायला, (सर्वांच्या सुरक्षिततेसाठी) कोरोनाने धडे द्यायला सुरुवात केली होती .पंचेंद्रियाचे महत्व तेव्हाच पटले जेव्हा जीभ व  नाक संपावर गेले. 

पाच दिवसानंतर मात्र लक्षणे बघून टेस्ट करून घ्यायला गेलो मात्र जवळच्या तथाकथित लॅबमध्ये तेथील तोबा गर्दी पाहता एक क्षण काळजात चर्र झाले नव्हे या लोकांमुळे तर आपल्याला लागण होणार नाही या भीतीने आम्ही पुढचा पाय मागे घेतला. तीन दिवस वासही चवहीन या गोष्टीचा “आस्वाद “झाल्यावर चौथ्या दिवशी अचानक स्वयंपाक घरातील फोडण्याचे वास येऊ लागले. देवघरातील उदबत्ती ,अन्नाचा! काय विचारता सोय नाहि. माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही .देवाला पेढे वाटून आभारच मानले मी व त्या दिवशी कितीतरी दिवसांनी उपाशीपोटी असल्यासारखे व आधाशा सारखे मी जेवले .औषधी सुरूच होत्या .Home quarantine राहून आपल्या माणसांपासून दूर राहणे, अगदी कुष्ठरोगी( नकळत वाळीत टाकल्यासारखे) व अस्पृश्य (त्याकाळचे ) वाटत होते. अतिशय जीवघेणा प्रकार होता.

सासू-सासरे पडले आजारी 

या सर्व प्रकाराला वीस दिवस उलटून गेले. आता मात्र हुशारी वाटू लागली होती व सर्व लक्षणे नाहीशी झाली होती आणि मी कामाला हळूहळू सुरुवात केली. बाहेर सुटकेचा श्‍वास घेतो न घेतो तोच पाहिले की कामवाली बाई आजारी व माझे सासरे( वय ८७) सर्दी व कफाने बेजार आहेत. आता मात्र धाबे दणाणले होते. माझे सासरे डायबेटिक व श्रवणशक्ती अत्यंत कमी झालेले, परंतु परवापर्यंत ठणठणीत ,आत्मनिर्भर असलेला माणूस पलंगावर आजारी पडतो, सोबत सासुबाई देखील इतके दिवस एकट्यानेच कामे करून करून थकल्या होत्या. सर्दी व ताप सुरू झाले .

मुलालाही लॉस ऑफ स्मेल 

एकीकडे कामवाल्या बायका नाही तर दुसरीकडे माझ्यात पूर्वीसारखी तेवढी ताकद नव्हती. कसेबसे दिनक्रम चालू होता. आज ज्या वयात आपल्या माणसांची साथ सोबत, मदत हवी असते त्या वयात सासऱ्यांना ठेवावे लागले. सावरकरांची काळ्यापाण्याची गोष्टी ज्या आत्तापर्यंत आम्हाला सांगत होते तशीच काहीशी वेळ Isolation मध्ये राहण्याची आली. केवढा हा मनावर दगड ठेवून वागण्याचा कयास. आपल्यात कठोर मन आहे याचा दुर्दैवाने वाईट वाटत होते. दोन दिवस सर्दी व कफ आणि जोर पकडला मात्र माझ्या मोठ्या मुलाला ला Loss of Smell होऊ लागला .बाकी कोणतीच लक्षणे नव्हती. 

आयसोलेट होणार कसे? 

मग काय लिंबूपाणी, वाफारा, काढे, औषध ,गिलोय सोड्याचे  नस्य, हळद दूध जिथे म्हणून काय उपाय सापडतील तेथे सर्व करून पाहिचे हाच चंगच झाल्यामुळे इतकी दहशत पसरली की नीट Isolate करायला घर मोठंच असावं? प्रत्येक खोलीला वेगळे टॉयलेट असायलाच पाहिजे? असं कसं काय साधणार बिकट प्रश्न होता. सुदैवाने घर भरपूर मोठ असल्याने माझ्याकडे तरी हा प्रश्न भेडसावणार नव्हता परंतु इतरांचा विचार करायला मला वेळच नव्हता.

कुटूंबियांना अक्षरशः कैदेचा अनुभव 

आतापावेतो मला अर्धी डॉक्टर की झाल्यासारखं भासत होते, कारण सर्व लक्षणे व उपाय औषधी पाठ झाली होती. झालं! आता सर्वदूर तोबा गर्दीमुळे सासऱ्यांचे so called waiting मुळे खूप हाल झाले. पैशाचा तर चुराडा वर चुराडा होत होता. पूर्णपणे मनमानी चालली होती. काहिच धरबंध नव्हता. परंतु मला माझ्या कुटुंबाची तरी निदान जबाबदारी समर्थपणे पेलायचे होती आणि कोविड काय राक्षसाचा नाश करायचा होता .पॉझिटिव्ह आधीच असलेले दोघेही फुल्ली कैदेत गेले .त्यांचे कपडे, भांडी, खोली, टॉयलेट सर्व वीटाळशाबाई सारखे वेगळी झाली. 

अखेर दिसू लागला आशेचा किरण 

खूप चिडचिड झाली .त्रागा झाला सुरुवातीला. आत्मनिर्भरता तेही उतारवयात हे एक सासर्‍यांचा समोर आव्हानच होते .कमी ऐकू येणे, हात थरथरणे, झोक जाणे आणि तोंडातून शब्द न फुटणे, किती आणि कसं काय सोसावे ?दत्त प्रश्न होता home quarantine मध्ये दिवस मोजणी सुरू झालं. मुलगा अतिशय एक्टिव असल्यामुळे तो आत्मनिर्धार पण एन्जोय करत होता. सतत मास्क,शिल्ड, ग्लोवज तर आम्हा सासू सुनेचा ड्रेस कोड असायचा. परंतु एका आठवड्यानंतर व्यवस्थित सर्व स्थिरस्थावर होत गेले. त्यांनाही पटलं की आपल्याला साथ देणे हेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे देवाच्या कृपेने त्यांच्यात सुधारणा दिसू लागली.

जणू आकाशच झाले ठेंगणे  

बरं होण्याची उमेद त्यांच्यात जाणवू लागली मग काय आम्ही उरलेले पण टेस्टसाठी लढायला सज्ज झालो. सुरक्षेसाठी एका टोकनवर पूर्ण फॅमिली अरे वा तेही फुकट मग काय विचारता अख्खे कुटुंब सज्ज जसे मावळे येतात तसे एक पूर्ण दिवस फक्त टेस्टमध्ये. नाईलाज दुसरं काय. आलिया भोगासी.पास की नापास रे? भरून रिपोर्ट घेऊन जाण्याचा निरीक्षण करायचे. सगळं कसं मन सुन्न करून टाकणारे होतं. परंतु एकदा घशात हात टाकला की हाडूक काढूनच बाहेर यायचं होतं आणि मग एकदाचा नंबर लागला खिडकीजवळ आल्यासारखे. जेव्हा आतून निगेटिव्ह असा शब्द ऐकू आला तेव्हा मात्र आभाळ ठेंगणे वाटायला लागले. कोणाला कशात आनंद उपभोगता आला पाहिजे हे मात्र गूढच आहे. मग युद्ध जिंकून आल्यासारखे विजयी घोडदौड करीत आलो पुन्हा आमच्या अंदमानात.

केवळ एका वाक्याने कोरोनाचा पाडला फडशा

या सर्व गोष्टीला आता 15 दिवस उलटून गेले .देवाला खूप आणाभाका झाल्या ,जप् जाप्य झाले ,कारण जेव्हा हतबलता अनुभवतो नं, तो क्षण फार विदारक असतो परंतु माझ्या कुटुंबाने दाखवलेली ही पॉझिटिव टेस्ट अगदी पॉझिटिव्हली दिली होती आणि त्यात आम्ही सर्व पास झालो होतो. या अनुभवानंतर प्रश्न हा पडला की आता बी पॉझिटिव कोणाला म्हणावे की नाही ?असो. विनोदाचा भाग सोडला तरी “माझं कुटुंब माझी जबाबदारी”आणि ती मी निभावणारच या घोषवाक्य ने आम्ही कोरोनाचा फडशा पाडला होता, त्याला नेस्तनाबूत केले होते, पार नामशेष केले होते. एकत्र कुटुंब वाईट नसते हो! फक्त व्यक्ती तितक्या वल्ली असतात. सगळे तुम्हाला हवे तसे कसे काय बरं असणार ?हाताची बोटच ती.असो. तर मग अशीच विजयी घोडदौड चालू राहू द्या.

लेखिका - नंदिनी गोडबोले.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com