लढाई जिंकली, पण युद्ध हरले!

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : पहिल्या डावात 87 धावांची आघाडी अन्‌ दोन दिवस वर्चस्व गाजवूनही सामना गमवावा लागत असेल तर, खेळाडूंना दुःख होणे साहजिक आहे. असाच काहीसा कटू प्रसंग 31 वर्षांपूर्वी विदर्भ रणजी संघावर जयपूरमध्ये आला होता. शेवटच्या दिवशी गोलंदाजांच्या प्रभावहीन कामगिरीमुळे विदर्भाला राजस्थानविरुद्धच्या त्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. आणीबाणीच्या प्रसंगी राजस्थानच्या दीपक जैन यांनी नाबाद शतक ठोकून विदर्भाच्या आशेवर पाणी फेरले होते.


1989 मध्ये 15 ते 17 ऑक्‍टोबरदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात सुहास फडकर, प्रशांत वैद्य, संजय जुगादे, कर्णधार हेमंत वसू व प्रवीण हिंगणीकर यांनी फलंदाजी व गोलंदाजीत चमकदार कामगिरी करून विदर्भाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले होते. दुर्दैवाने "फिनिशिंग टच' देण्यात ते अपयशी ठरले. विदर्भ संघात वरील पाच खेळाडूंसह एम. अगस्ती, उमाकांत फाटे, समीर गुजर, उस्मान गनी, प्रीतम गंधे, भरत ठाकरेचा समावेश होता. तर यजमान राजस्थान संघात कर्णधार एस. व्यास, संजू मुदकवी, पदम शास्त्री, प्रदीप सुंदरम, जे. माथूर, दीपक जैन, अमित असावा, पी. के. कृष्णकुमार, युनूस अलीसारखे नावाजलेले खेळाडू होते.

प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या विदर्भाची प्रदीप सुंदरम यांनी चांगलीच दाणादाण उडविली. अवघ्या 14 धावांमध्येच विदर्भाचा निम्मा संघ गारद झाला. या कठीण प्रसंगी फडकर आणि वैद्य यांनी आठव्या गड्यासाठी 149 धावांची भागीदारी रचून विदर्भाला 250 धावांपर्यंत पोहोचविले. फडकर यांचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले, तर वैद्य यांनी वेगवान 72 धावा काढल्या. सुंदरम यांनी आठ गडी बाद केले. त्यानंतर विदर्भाच्या गोलंदाजांनीही राजस्थानची अशीच दाणादाण उडविली. त्यांचा डाव 163 धावांवर गडगडला. विदर्भाला 87 धावांची आघाडी मिळवून देण्यात जुगादे (पाच बळी) आणि वैद्य (तीन बळी) यांनी मोलाची भूमिका वठविली. विदर्भाने दुसऱ्या डावात 272 धावा काढून यजमानांना 360 धावांचे भले मोठे विजयी लक्ष्य दिले. यावेळीदेखील वैद्य यांनी सर्वाधिक 65 धावा फटकावून आपले अष्टपैलूत्व सिद्ध केले. याशिवाय वसू यांनी 49, अगस्ती यांनी 39 व हिंगणीकर यांनी 35 धावा काढल्या.

शतकवीर जैन ठरले "मॅचविनर'
विजयासाठी शेवटच्या दिवशी साडेतीनशेच्या वर धावा काढणे कोणत्याही संघासाठी तशी कठीणच बाब. पण, राजस्थानने ती किमया करून दाखविली. तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या जैन यांनी नाबाद 167 धावांची "मॅचविनिंग' खेळी करत आपल्या संघाला पाच गड्यांनी अशक्‍यप्राय विजय मिळवून दिला. असावा यांनी 79 व कृष्णकुमार यांनी 49 धावा काढून विजयास हातभार लावला. विजयाची सुवर्णसंधी असूनही पदरी अपयश आल्याने वैदर्भी खेळाडू दुःखी व निराश झाले. त्या दिवशी विदर्भाने लढाई अवश्‍य जिंकली, पण युद्धात मात्र पराभूत झाला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com