ऐन दिवाळीत घराघरांत साचणार कचरा!

राजेश प्रायकर
Thursday, 29 October 2020

शहरातील घराघरांतून कचरा गोळा करण्याचे कंत्राट एजी व बीव्हीजी या कंपन्यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी पाच झोनची जबाबदारी देण्यात आली.

नागपूर : ऐन दिवाळीच्या तोंडावर पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर एजी एन्व्हायरो कंपनी आणखी सव्वाशे कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याची चर्चा जोरात आहे. त्यामुळे पाच झोनमधील घरांत दिवाळीचा कचरा साचण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागानेही ‘एजी`ला इशारा दिला.

शहरातील घराघरांतून कचरा गोळा करण्याचे कंत्राट एजी व बीव्हीजी या कंपन्यांना देण्यात आले आहे. दोन्ही कंपन्यांना प्रत्येकी पाच झोनची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी कचरा गोळा करणाऱ्या कनक रिसोर्सेस कंपनीचे १४०० कर्मचारी होते. दोन्ही कंपन्यांना यातील प्रत्येकी ७०० कर्मचारी विभागातून देण्यात आले. 

त्यानंतर या कंपन्यांकडे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही नियुक्ती देण्यासाठी दबाव निर्माण केला. परिणामी दोन्ही कंपन्यांनी तीनशे ते चारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. आता गेल्या वर्षभरापासून शहरातील लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घरातून कचऱ्यांची उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढण्याचा सपाटा एजीने लावला आहे.

अधिक माहितीसाठी - श्वास घेण्यास त्रास होतोय? घाबरू नका पुढील उपाय करा आणि घ्या मोकळा श्वास
 

नुकताच पावणे दोनशे कर्मचाऱ्यांच्या घरी पत्र पाठवून एजीने त्यांना धक्का दिला. कोरोनाच्या संकट काळात जोखीम पत्करत घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळीच्या तोंडावर काढण्यात आल्याने त्यांच्यात संताप आहे. आता आणखी १२० कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात येणार असल्याची कर्मचाऱ्यांत चर्चा आहे. 

यातून अनेक कर्मचारी दहशतीत काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांना काढताना दोन महिन्यांचे वेतन देण्यात येत आहे. परंतु नोकरी गेल्याने अनेक जण नैराश्यात आहेत. आता पुन्हा कुणावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार? अशा दहशतीत कर्मचारी कचरा गोळा करीत आहे. आणखी सव्वाशे कर्मचारी कमी झाल्यास लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली व नेहरूनगर या पाच झोनमधील घराघरातील कचरा संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

दिवाळीत सर्वच नागरिक घरांची स्वच्छता करतात. या काळात कचराही मोठ्या प्रमाणात निघतो. परंतु कर्मचाऱ्यांचीच कपात झाल्यास कचरा गाडीच्या फेऱ्याही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी दिवाळीत घरातील कचरा घरांमध्येच राहण्याची शक्यता बळावली आहे. याशिवाय या कर्मचाऱ्यांची दिवाळीही अंधारात जाणार आहे. एजीने १८० कर्मचारी काढल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र, महापालिकेला केवळ १४० कर्मचारी काढल्याचे पत्र दिले.

एजीला महापालिकेचे पत्र
एजी कंपनीने १४० कर्मचाऱ्यांना काढल्याचे पत्र दिले आहे. शहरातील कचरा संकलनावर कुठलाही परिणाम होऊ नये, असे नमूद करीत एजीला महापालिकेनेही पत्र दिले.
डॉ. प्रदीप दासरवार, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: AG Enviro company will remove employees