कोरोना संकटात ‘ओली पार्टी’, दारुड्यांना आवरणार कोण? 

योगेश बरवड 
Sunday, 27 September 2020

पंजाबी लाईन नावाने ओळखली जाणारी रेल्वेची जुनी वसाहत आहे. फार जुने आणि जीर्ण झालेले क्वॉर्टर पाडण्यात आले असून, उर्वरित ढाच्यांना ‘खंडर’चे स्वरूप आले आहे. हा उजाड भाग असामाजिक तत्त्वांसाठी नंदनवनच ठरला आहे.

नागपूर  : पंजाबी लाईन येथील रेल्वे क्वॉर्टर परिसरात कोरोना काळात चक्क दारू पार्ट्या रंगत आहेत. या प्रकाराने स्थानिक रहिवासी भयभीत झाले असून, दारुड्यांना आवर घालणार तरी कोण? असा प्रश्न विचारला जात आहेत.

पंजाबी लाईन नावाने ओळखली जाणारी रेल्वेची जुनी वसाहत आहे. फार जुने आणि जीर्ण झालेले क्वॉर्टर पाडण्यात आले असून, उर्वरित ढाच्यांना ‘खंडर’चे स्वरूप आले आहे. हा उजाड भाग असामाजिक तत्त्वांसाठी नंदनवनच ठरला आहे. लगतच्या भागातील उनाड युवक सायंकाळपासून या भागात गोळा होतात. अंधार पडताच पेग रिचवण्याचा क्रम सुरू होतो. 

सविस्तर वाचा - शरीरावरील प्रत्येक तीळ काहीतरी सांगतो, जाणून घ्या तिळाचे जीवनातील महत्त्व

त्यांना आवर घालण्याची हिंमत कुणीच दाखवत नाही. मुक्त आणि मनमानी वावर या भागात दिसून येतो. हा भाग रेल्वेचा असल्याने पोलिस फारसे लक्ष देत नाही. तर, दुसरीकडे रेल्वे सुरक्षा दलाचेही याकडे लक्ष नाही. राजरोसपणे चालणाऱ्या या पार्ट्या ही रोजचीच बाब झाली आहे. रात्री उशिरापर्यंत या टवाळखोरांची मनमानी सुरू असते.

निवासी गाळ्यांमध्येही ‘चिअर्स’

काही कर्मचारी क्वॉर्टरमध्ये एकटेच राहत असल्याने मित्रांना सोबत घेऊन पार्ट्या होतात. बरेचदा पार्टीत सहभागी होणाऱ्यांची संख्याही मोठी असते. क्वॉर्टरसमोर लागणाऱ्या गाड्यांवरून याचा अंदाज येतो. अनेकदा तर क्वॉर्टर नावावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितही मित्रांची पार्टी रंगत असल्याची बाबही समोर आली आहे. नेहमीच संपर्क येणार असल्याने शेजारीही याप्रकाराची तक्रार करताना दिसत नाहीत. या प्रकारालाही आवर घालण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol parties in the Corona crisis