कांद्यांखाली दडलंय काय? पोलिसही झाले अवाक्‌

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जून 2020

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यांनाही आश्‍चर्य वाटले. या तस्करांनी शक्कल लढवून कांद्याच्या पोत्यांखाली दारू लपवली होती. चक्क विदेशी मद्याचे सहा खोके आढळून आले.

नागपूर : दोन-अडीच महिने दारूदुकाने बंद होती. मात्र, दारूतस्करी काही थांबली नाही. आता नियमांमध्ये शिथिलता आली असली, तरी लॉकडाउन कायम आहे. या काळातही मद्यतस्करी जोमात सुरू आहे. दारूतस्कर नवनवीन शक्कल लढवून दारूची तस्करी करीत आहेत. मात्र, पोलिसही त्यांना शिताफीने हुडकून काढत आहेत. अशा अनेक घटना उजेडात आल्या आहेत. 

संदीप हेडाऊ (30, रा. बहादुरा फाटा) आणि रवींद्र भांदककर (29, रा. दिघोरी घाटाजवळ) हे दोघेही गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास अशोक लेलॅंड कंपनीचे मालवाहू वाहन घेऊन पाचपावली परिसरातून जात होते. याच दरम्यान पाचपावली पोलिसांचे गस्ती पथक तिथून जात होते. पोलिसांना दोघांच्याही हालचाली संशयास्पद दिसल्या. त्यांनी त्यांचे वाहन थांबविले. वाहनचालक संदीप हेडाऊ याची चौकशी केली. मात्र, तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे पोलिसांची शंका अधिक बळावली. 

हेही वाचा : अस्वलीने शिकाऱ्यांना ठार मारून घेतला बदला

पोलिसांनी वाहनाची तपासणी केली. तेव्हा त्यांनाही आश्‍चर्य वाटले. या तस्करांनी शक्कल लढवून कांद्याच्या पोत्यांखाली दारू लपवली होती. चक्क विदेशी मद्याचे सहा खोके आढळून आले. त्यात एकूण 164 बाटल्या होत्या. या मद्याची किंमत 54 हजारांच्या घरात आहे. आरोपींकडू वाहनांच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांना माहिती देता आली नाही. या प्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Alcohol smugglers arrested