यंदा निळ्या पाखरांनी गजबजणार नाही दीक्षाभूमी; सर्व कार्यक्रम रद्द, ५७ वर्षांत प्रथमच खंड

नीलेश डोये
Friday, 25 September 2020

नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर कोट्यवधी लोकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत कोरोनासंबंधीच्या सूचनांचे पालन करणे अशक्य आहे. सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नाही. 

नागपूर  :  कोरोनामुळे दीक्षाभूमीवर होणाऱ्या ५७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा आणि त्या अनुषंगाने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. परमपूज्य डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने ही घोषणा करून नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरीच अभिवादन करावे, असे आवाहन केले आहे. त्यामुळे यंदा पवित्र दीक्षाभूमीवर अनुयायांची गर्दी दिसणार नाही.

स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी यासंदर्भात पत्रक जारी केले आहे. सध्या नागपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशोक विजयादशमीला दीक्षाभूमीवर कोट्यवधी लोकांची गर्दी होत असते. अशा परिस्थितीत कोरोनासंबंधीच्या सूचनांचे पालन करणे अशक्य आहे. सर्व बांधवांचे आरोग्य धोक्यात घालणे योग्य होणार नाही. 

अधिक वाचा - रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी औषधे विकत घेऊ नका; आहारतज्ज्ञ डॉ. जयश्री पेंढारकर यांचा सल्ला
 

त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे दीक्षाभूमीवर होणारे यावर्षीचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय स्मारक समितीने घेतला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी येत्या १४ ऑक्टोबर व अशोक विजयादशमीला २५ ऑक्टोबर रोजी सर्व नागरिकांनी आपापल्या घरीच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करावे, असे आवाहनही या पत्रकाद्वारे केले आहे.

दुकानांनाही परवानगी नाही

दीक्षाभूमीवर यंदा दरवर्षीप्रमाणे कोणताही कार्यक्रम होणार नाही. त्यामुळे दुकानांनासुद्धा परवानगी देण्यात येणार नाही, असेही स्मारक समितीने स्पष्ट केले आहे.

 
अनुयायांच्या हितासाठी निर्णय 
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मक्रांतीच्या महत्त्वपूर्ण घटनेने नागपूर हे शहर जगाच्या नकाशावर आले. दीक्षाभूमी या नावाने नागपूरला एक नवी ओळख प्राप्त झाली. हा धम्म दीक्षा सोहळा कोरोना संकटामुळे यावर्षी रद्द करण्यात आला. अनुयायांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.
-डॉ. सुधीर फुलझेले, सचिव,स्मारक समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: all events of Dhamma Chakra pravartan din canceled due to corona