पुरी येथील रथयात्रेला परवानगी दिली; आम्हालाही द्या..

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यामुळे, यात्रेला तशाच प्रकारची परवानगी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांतर्फे करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने सदर युक्तिवाद फेटाळून लावला. जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेबाबतची परिस्थिती भिन्न होती. तसेच, त्या यात्रेच्या परवानगीबाबत दिलेला आदेशाला कायद्याचे स्वरूप नाही. त्यामुळे, त्या आदेशाच्या अनुषंगाने इतर कोणत्या यात्रेला परवानगी देता येणार नाही, असे आदेशमध्ये नमूद केले.

नागपूर : सुमारे तीनशे वर्षांपासून धापेवाडा येथे आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या यात्रेला जिल्हाधिकारी यांनी कोरोनामुळे लागू केलेल्या बंदी आदेशात काही सवलत देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. मात्र, निवडक लोकांना पूजा व इतर विधी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी मागण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली.

याचिकेनुसार, कोरोनामुळे घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडा येथील यात्रेवर बंदी घातली. धापेवाडा येथे आषाढी एकादशीला येणाऱ्या विविध दिंडी, पालखी आणि भक्तांची कोणतीही गर्दी होणार नाही, असे आदेशात नमूद केले. त्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. 10 ते 15 भक्तांच्या उपस्थितीमध्ये या यात्रेचे आयोजन करू देण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली.

वाचा : आयुक्‍त तुकाराम मुंढेंची घेराबंदी, महिला अधिकाऱ्यांनी केली ही तक्रार, वाचा काय झाला प्रकार...

याचिकाकर्त्यांतर्फे बाजू मांडताना ऍड. ए. डी. भाटे म्हणाले, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला आव्हान देण्यात आलेले नाही. तर, त्या आदेशात काही सवलती हव्या आहेत. कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागात होऊ नये म्हणून दिंडी, पालखी व भक्तांच्या गर्दीला बंदी घातली असून त्यावर कोणताही आक्षेप नाही. तर, आषाढी एकादशीला मंदिर परिसरात होणारे आवश्‍यक विधी करण्यासाठी देवस्थान संस्थानच्या निवडक प्रतिनिधींना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेला काही अटींच्या अधीन राहून परवानगी दिली होती. त्यामुळे, धापेवाडा येथील यात्रेला तशाच प्रकारची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली. मात्र, उच्च न्यायालयाने सदर युक्तिवाद फेटाळून लावला. जगन्नाथ पुरी येथील रथयात्रेबाबतची परिस्थिती भिन्न होती. तसेच, त्या यात्रेच्या परवानगीबाबत दिलेला आदेशाला कायद्याचे स्वरूप नाही. त्यामुळे, त्या आदेशाच्या अनुषंगाने इतर कोणत्या यात्रेला परवानगी देता येणार नाही. तेव्हा धापेवाडा येथील उत्सवाला निवडक प्रतिनिधींना परवानगी हवी असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यावे, असे नमूद करीत याचिका फेटाळून लावण्यात आली. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Allowed the rathyatra at Puri; Give it to us also