महापालिकेने निधी दिला, पण अंबाझरी बंधाऱ्याचे बळकटीकरण झालेच नाही; महापौर सिंचन विभागावर नाराज

राजेश प्रायकर
Saturday, 17 October 2020

महापौर जोशी यांनी शुक्रवारी अंबाझरी तलावाच्या विवेकानंद स्मारक ओव्हरफ्लो पॉईंट जवळील बंधाऱ्याचे निरीक्षण केले. मनपाच्या सार्वजनिक अभियंत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी यावेळी बंधारा दुरुस्तीबाबत सिंचन विभागाला सूचना देण्यात आल्याचे सांगितले.

नागपूर : अंबाझरी तलावाचा बंधारा फार जुना असून इथं मेट्रो रेल्वेचे पिलरही उभे आहेत. महामेट्रोने या बंधाराच्या बळकटीकरणासाठी एक कोटी महापालिकेला दिले. महापालिकेने सिंचन विभागाकडे वळते केले. परंतु, हा निधी अद्यापही पडून आहे. महापौर संदीप जोशी यांनी सिंचन विभागावर नाराजी व्यक्त करीत तत्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले. 

हेही वाचा - पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला

जोशी यांनी शुक्रवारी अंबाझरी तलावाच्या विवेकानंद स्मारक ओव्हरफ्लो पॉईंट जवळील बंधाऱ्याचे निरीक्षण केले. मनपाच्या सार्वजनिक अभियंत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी यावेळी बंधारा दुरुस्तीबाबत सिंचन विभागाला सूचना देण्यात आल्याचे सांगितले. बंधाऱ्याची अवस्था लक्षात घेता सिंचन विभागाने बंधाऱ्याची दुरुस्ती तत्काळ करावी. या महत्त्वाच्या विषयावर मेट्रो, सिंचन विभाग व मनपाची संयुक्त बैठक पुढील आठवड्यात आयोजित करण्याची सूचनाही त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना केली. हा फार जुना बंधारा असून भिंतीची अवस्था जीर्ण झाली आहे. अशात त्या बंधाऱ्याला तडा जाऊ नये, त्याला धोका पोहोचू नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. असे असतानाही मेट्रोने बांधकामादरम्यान निघालेली माती तेथे टाकली. यावरही महापौरांनी नाराजी व्यक्त करीत माती तत्काळ हटविण्याचे निर्देश दिले. मेट्रोमुळे अंबाझरी तलावाला धोका पोहोचेल, अशा आशयाची कोणतीही तक्रार येता कामा नये, असेही ते म्हणाले. या दौऱ्यात धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, ज्येष्ठ नगरसेविका वर्षा ठाकरे, डॉ. परिणिता फुके व कार्यकारी अभियंता मनोज गणवीर उपास्थित होते. 

हेही वाचा - कोरोनामध्येही खासगी शाळांचा शुल्कासाठी तगादा, पालक कर्ज काढून भरताहेत शुल्क

गोंड राजांनी बांधला तलाव - 
गोंड राजांनी या तलावाची निर्मिती केली. या तलावासभोवताली आंब्याची झाडे होती. त्यामुळे अंबाझरी नाव पडल्याची अख्यायिका आहे. भोसले घराण्याच्या शासनकाळात या तलावात सुधारणा करण्यात आल्या होत्या. १८६९ मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे तलावाच्या बांधकामात अनेक बदल करण्यात आले. या तलावाची उंची १७ फुटाने व क्षमता तिपटीने वाढविण्यात आली होती, अशी नोंद आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ambazari dam still not develop by irrigation department in nagpur