esakal | पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला
sakal

बोलून बातमी शोधा

youth died by falling in well at chimur of chandrapur

मंदिराच्या भिंतीवर चढून रंगरंगोटी करताना तोल गेल्याने बाजूच्या विहिरीत पडला. त्याने पोहोण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले आणि यातच बुडून त्याचा मृत्यू झाला. 

पोटाची खळगी भरण्यासाठी भवानी मंदिराची रंगरंगोटी करायला गेला, पण काळाने घातला घाला

sakal_logo
By
जितेंद्र सहारे

चिमूर (जि. चंद्रपूर): भवानी मातेच्या मंदिराची रंगरंगोटी करताना तोल जाऊन शेजारच्या विहिरीत पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 16) सकाळी 9 वाजताच्या सुमारास येथील प्रभाग क्रमांक 13 गुरुदेव वॉर्डात घडली. रवींद्र हेमराज निनावे (वय 35) ,असे मृत तरुणाचे नाव आहे.

तालुक्‍यातील शेंडेगाव-सोनेगाव येथील मूळचा रहिवासी असलेला रवींद्र निनावे हा मागील काही दिवसांपासून चिमूर येथील हरणे यांच्या घरी कुटुंबीयांसह किरायाने राहत होता. मजुरी करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. तो शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास नवरात्रीनिमित्ताने भवानी मातेच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यासाठी गेला. मंदिराच्या भिंतीवर चढून रंगरंगोटी करताना तोल गेल्याने बाजूच्या विहिरीत पडला. त्याने पोहोण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला अपयश आले आणि यातच बुडून त्याचा मृत्यू झाला. 

हेही वाचा - कुठे गेल्या दोन हजारांच्या नोटा?, काढले जाताहेत अनेक...

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पीएसआय अलिम शेख करीत आहेत.