अमरावतीकरांनी 40 वर्षांपूर्वी केली होती रणजी सामन्याला तुफान गर्दी 

नरेंद्र चोरे
बुधवार, 17 जून 2020

विदर्भाच्या पराभवाने अमरावतीकर निराश झाले. परंतु, दोन बलाढ्य संघांमधील ऐतिहासिक लढत जवळून पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. अंबानगरीत झालेल्या त्या रणजी सामन्याचा प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी मैदानाच्या सभोवताल प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली होती. शिवाय सामन्याचे रेडिओवरून समालोचनही झाले होते. कित्येक वर्षेपर्यंत त्या सामन्याची शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होती. 

नागपूर  : नागपूरसारख्या महानगरांमध्ये क्रिकेटचा सामना असेल तर, त्याची कुणालाच नवलाई नसते. मात्र, तोच सामना एखाद्या छोट्याशा शहरात असेल तर त्याची चर्चा अख्ख्या पंचक्रोशीत होते. असाच एक रणजी सामना 40 वर्षांपूर्वी अमरावतीच्या क्रिकेटप्रेमींना "याचि देही याचि डोळा' पाहायला मिळाला होता. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर विदर्भ आणि राजस्थान संघांत रंगलेल्या त्या ऐतिहासिक लढतीचा आनंद घेण्यासाठी तिन्ही दिवशी हजारो क्रिकेटप्रेमींनी मैदानावर तुफान गर्दी केली होती. या सामन्यात विदर्भ अवश्‍य पराभूत झाला, परंतु क्रिकेटच्या गोड आठवणींचा ठेवा त्यांच्या दिर्घकाळ स्मरणात राहिला. 

1980 मध्ये 13 ते 15 डिसेंबरदरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात अशोक भागवत यांच्या नेतृत्वाखालील विदर्भ संघात जयंतीलाल राठोड, प्रदीप अणे, सतीश टकले, सुनील हेडाऊ, शिरीष जोशी, भास्कर जोशी, विकास गवते, मदन कावरे, विकास शेष, हेमंत वसूसारखे धुरंधर खेळाडू होते. तर यष्टिरक्षक- कर्णधार सुनील बेंजामिन यांच्या नेतृत्वातील राजस्थान संघात सलामीवीर टंडन, डी. माथूर, संजू मुदकवी, टी. चॅटर्जी, गजराज सिंग, एस. जोशी, एस. व्याससारख्या नावाजलेल्या खेळाडूंचा समावेश होता. "मॅटिन विकेट'वर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करणाऱ्या विदर्भाचा डाव टकले (69 धावा), राठोड (53 धावा) व भागवत (52 धावा) यांच्या अर्धशतकानंतरही केवळ 221 धावांतच आटोपला. फिरकीपटू व्यास यांनी सहा गडी बाद करून विदर्भाचे कंबरडे मोडले. 

विदर्भाने उतरविली रुळावरून रेल्वे! 28 वर्षांपूर्वी काय घडले वाचा सविस्तर

प्रत्युत्तरात राजस्थानने 297 धावा काढून पहिल्या डावात 76 धावांची आघाडी घेतली. चॅटर्जी यांनी सर्वाधिक 84 आणि नवव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या विवेकसिंग यांनी तडकाफडकी 43 धावा काढून राजस्थानला निर्णायक आघाडी मिळवून दिली होती. विदर्भाकडून भास्कर जोशी यांनी चार आणि रणजी पदार्पण करणाऱ्या गवते व शेष यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या डावात तर विदर्भाची चांगलीच दाणादाण उडाली. जोशी व मुदकवींच्या भेदक माऱ्यापुढे अवघा संघ 119 धावांत गारद झाला. विदर्भाचा एकही फलंदाज तिशी ओलांडू शकला नाही. जोशींनी चार व मुदकवींनी तीन बळी टिपून एक दिवसाआधीचा विदर्भाचा पराभव निश्‍चित केला. 

 

विदर्भाने 61 वर्षांपूर्वी मिळविला होता पहिला रणजी विजय, नेमके काय घडले वाचा

 

तासाभरातच केले विजयावर शिक्‍कामोर्तब 

राजस्थानला विजयासाठी जेमतेम 44 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी अवघ्या तासाभरातच तीन गडी गमावून लीलया गाठले. विदर्भाच्या पराभवाने अमरावतीकर निराश झाले. परंतु, दोन बलाढ्य संघांमधील ऐतिहासिक लढत जवळून पाहायला मिळाल्याचे त्यांना समाधानही होते. अंबानगरीत झालेल्या त्या रणजी सामन्याचा प्रेक्षकांना आनंद घेता यावा, यासाठी मैदानाच्या सभोवताल प्रेक्षक गॅलरी बांधण्यात आली होती. शिवाय सामन्याचे रेडिओवरून समालोचनही झाले होते. कित्येक वर्षेपर्यंत त्या सामन्याची शहरातील क्रिकेटप्रेमींमध्ये चर्चा होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati cricket lovers enjoyed Ranji Trophy match 40 years ago