...अन्‌ बॉयफ्रेंड सुसाट पळाला; लॉकडाउनमध्ये प्रेमियुगुलांची आफत

अनिल कांबळे
सोमवार, 1 जून 2020

सर्वांत मोठी पंचाईत झाली ती आईवडील आणि वस्तीतील टाळक्‍यांच्या चोरून एकमेकांना भेटणाऱ्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची. संचारबंदी असल्यामुळे सर्व कुटुंब घरातल्या घरात बसले आहे. बाहेर पडायची सोय नाही. त्यातही चोरून-लपून फोनवरून बोलण्याचा प्रयत्नसुद्धा मोठ्या महागात पडण्याची भीती. अशा द्विविधा मन:स्थितीत बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड हे नातं अडकलं आहे.

नागपूर : प्रेमियुगुलांच्या थव्यांमुळे नेहमी भरगच्च भरत असलेला फुटाळा तसेच अंबाझरी तलाव आज ओस पडला आहे. कोरोनामुळे संचारबंदी आणि लॉकडाउन असल्याने अनेक बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना विरह सहन हात नाहीये. मात्र, आता संचारबंदी उठण्याचे संकेत असल्यामुळे प्रेमियुगुलांचे मन हिरवे झाले असून, फुटाळा त्यांना खुणावत असल्याची जाणीव होत आहे. 

प्रेमियुगुलांसाठी एकमेकांना भेटायचे हक्‍काचे ठिकाण म्हणजे फुटाळा आणि अंबाझरी तलाव. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमियुगुल फुटाळा, अंबाझरीवर तुडुंब गर्दी करतात. एकमेकांच्या बाहुपाशात आणि गप्पा-टप्पा करीत आयुष्याचा सारिपाट रंगविण्यासाठी फुटाळावर बसतात. सायंकाळच्या सुमारास चिक्‍कार गर्दी करीत प्रेमियुगुल अनेकदा प्रेमबंधनाची सीमासुद्धा ओलांडताना दिसतात. यासोबतच महाविद्यालयीन तरुण-तरुणींना सिगारेटचे झुरके आणि चिल्ड बिअरचे सीप घेण्यासाठीही फुटाळा पसंत आहे.

यासोबतच नुकताच वयात आलेले शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनीही फुटाळ्यावर पाठीवर दप्तर आणि हातात हात घालून वर्गमित्रांसोबत गप्पा मारण्यासाठी येतात. तसेच टवाळखोर पोरांची टोळी दुसऱ्यांच्या प्रेयसीची छेडखानी किंवा टवाळकी करण्यासाठी फुटाळा गाठतात. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून फुटाळा आणि अंबाझरी तलावावरील प्रेमियुगुलांची गर्दी एका झटक्‍यात गायब झाली. कोरोनाचे संकट आले आणि संचारबदी, लॉकडाउन सुरू झाले. त्याचा जसा व्यवसायावर परिणाम पडला, तसा सामाजिक जीवनावरही पडला.

सर्वांत मोठी पंचाईत झाली ती आईवडील आणि वस्तीतील टाळक्‍यांच्या चोरून एकमेकांना भेटणाऱ्या बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडची. संचारबंदी असल्यामुळे सर्व कुटुंब घरातल्या घरात बसले आहे. बाहेर पडायची सोय नाही. त्यातही चोरून-लपून फोनवरून बोलण्याचा प्रयत्नसुद्धा मोठ्या महागात पडण्याची भीती. अशा द्विविधा मन:स्थितीत बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड हे नातं अडकलं आहे. एकमेकांना भेटायची ओढ, उत्सुकता आणि आतुरता कायम आहे. पण, भेटता येत नसल्याने प्रेमियुगुलांचे मन कोमेजून गेले आहे. मात्र, वस्तीत कुटुंब तर बाहेर पोलिस कर्मचारी एकमेकांना भेटू देत नसल्याची खंत मात्र प्रेमियुगुलांना नक्‍की आहे. 

काका, ही माझ्यावर खूप प्रेम करते 
व्हीआयपी रोडवर सायंकाळच्या सुमारास अल्पवयीन प्रेमियुगुल बेंचवर बसलेले होते. तोंडाला मास्क लावलेला आणि हातात हात घेऊन दोघेही प्रेमाचे स्वप्न रंगवत असताना तेथे आम्ही पोलिस पॅट्रोलिंग व्हॅनसह पोहोचलो. आम्हाला बघून ते थबकले. संचारबंदी असताना येथे बसू नका, असे म्हटल्यावर "काका आम्ही खूप दिवसांनी भेटतोय. ही खूप प्रेम करते माझ्यावर. आईशी खोटे बोलून आली मला भेटायला', असे बोलून तो मुलगा गयावया करू लागला. त्या दोघांनाही पाच उठबशा काढायला लावल्या आणि पुन्हा दिसल्यास संचारबंदीचे उल्लंघन केल्याची कारवाई करण्यात येईल, असा सज्जड दम दिला. त्यानंतर प्रेमियुगुल बाईक काढून सुसाट पळायला लागले, हा किस्सा एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला. 
 

हेही वाचा : नवलच! माकडाचं पिलू घेत आहे 'ऑनलाइन' शिक्षण

आमच्यात मैत्री आहे... मग दे तुझ्या आईचा नंबर! 
जीपीओ चौकातून सीपी ऑफिसकडे जाणाऱ्या रोडवरील फुटपाथवर एक प्रेमियुगुल बसलेले होते. दोघांकडेही मास्क नव्हते. मुलीने चेहरा स्कार्फने झाकलेला होता तर मुलगा तिच्या खांद्यावर हात ठेवून होता. पोलिसांचे वाहन तेथे थांबले. एका महिला कर्मचाऱ्याने दोघांनाही जवळ बोलावले. "मॅडम आमच्यात फक्‍त मैत्री आहे. हा माझा नातेवाईकसुद्धा आहे. आम्ही खूप दिवसांनी भेटलोय', असे त्या मुलीने उत्तर दिले. "नातेवाईक आहे नं... मग तुझ्या आईचा नंबर दे. मी त्यांच्याकडून कन्फर्म करते', असे महिला पोलिस कर्मचाऱ्याने म्हटले. त्यानंतर तो मुलगा लगेच उठला आणि तिला सोडून पळून गेला. तेव्हा मुलीची समजूत घातली आणि घरी पाठवून दिले, हा किस्सा एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने सांगितला. 
 
...तर आम्ही कुठे भेटावे? 
संचारबंदीमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून आम्ही एकमेकांना भेटलो नाही. आता कुठेतरी नियमांमध्ये थोडी शिथिलता आली आहे. आमचे नेहमीचे भेटण्याचे ठिकाण म्हणजे फुटाळा. परंतु, आता तेथेही पोलिस बंदोबस्त आहे. रस्त्यावर कुणी नसल्याची संधी साधून कुठेतरी झाडाच्या आडोशाला उभे राऊन भेटायचे म्हटले की पॅट्रोलिंगवाले पोलिस मागे लागतात. मग आम्ही भेटायचे कुठे? असा सवाल मयूर लांडगे या युवकाने केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...And her boyfriend ran away