आजही दिसतो माणुसकीचा ओलावा! मनोरुग्ण वृद्धाला त्याचे कुटुंब भेटते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

आजोबा बरे झाले, परंतु विस्मरणाचा आजार. मुखातून केवळ पांढरकवडा हा शब्द उच्चारला आणि मेडिकलमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी या शब्दांच्या आधारे आजोबांची व्हिडिओ क्‍लिप तयार केली, ती व्हायरल केली. आणि अवघ्या काही दिवसात दुरावलेले कुटुंब आजोबाच्या भेटीला आले.

नागपूर : सत्तरी ओलांडलेले आजोबा. विस्मरणाच्या आजारामुळे शहरात एखाद्या मनोरुग्णासारखे भटकत होते. रस्त्यावर मिळेल ते खात होते. जागा मिळेल तेथे झोपत होते. रक्ताने माखलेल्या अवस्थेत असताना खाकीवर्दीच्या मदतीने मेडिकलमध्ये पोहचले.
येथील डॉक्‍टरांनी उपचार केले. आजोबा बरे झाले, परंतु विस्मरणाचा आजार. मुखातून केवळ पांढरकवडा हा शब्द उच्चारला आणि मेडिकलमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी या शब्दांच्या आधारे आजोबांची व्हिडिओ क्‍लिप तयार केली, ती व्हायरल केली. आणि अवघ्या काही दिवसात दुरावलेले कुटुंब आजोबाच्या भेटीला आले. कुटुबाला भेटताना आजोबांच्या डोळ्यातून पाणी आले. हा अनोखा मनोमीलन सोहळा मेडिकलच्या वॉर्ड 36 मध्ये रंगला.
तो दिवस होता 12 जून. एका पोलिसाने मानसिक आजारामुळे गंभीरावस्थेतील आजोबांना मेडिकलमध्ये आणले. वॉर्ड क्रमांक 36 मध्ये दाखल केले. येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. अर्चना देशपांडे यांच्या वैद्यकीय पथकाने त्यांच्यावर योग्य उपचार केले. हळूहळू आजारातून आजोबा बरे होत असल्याचे दिसत असताना सामाजिक अधीक्षक हरिश गजबे (वैद्यकीय) यांनी या आजोबांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. नाव काय आहे? कुठुन आलात? पत्ता काय? घरी कोण-कोण आहे? या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे ते देत नव्हते. ते मनोरुग्ण असल्याचे लक्षात आले.

काही दिवस मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारा नंतर हळूहळू त्यांच्यात सुधारणा दिसून येत होती. पांढरकवडा असा शब्द नकळत त्यांच्या तोंडातून निघाला. यानंतर मात्र व्हॉट्‌स ऍप या सोशल मीडियावर आजोबांचा फोटो व्हायरल करण्यात आला. त्यांची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सामाजिक अधीक्षक गजबे (वैद्यकीय) यांना आजोबांना ओळखत असल्याचा फोन मोबाईलवर आला. आणि त्यांचे कुटुंब मेडिकलमध्ये दाखल झाले. नुकतेच आजोबा आपल्या कुटुंबासोबत घरी परतले आहेत. त्यांनी उपचार करणाऱ्या डॉ. अर्चना देशपांडे यांच्यासह सर्व डॉक्‍टर, परिचारिका व किशोर धर्माळे यांच्यासह सर्व सामाजिक अधीक्षकांचे (वैद्यकीय) आभार मानले.

 हेही वाचा - वडेट्टीवार म्हणतात, विश्‍वास नसेल तर मी सारथीतून बाजुला व्हायला तयार!

पोलिसांची घेतली मदत
आजोबांचा परिवार मोठा आहे. घरी आर्थिक सुबत्ता आहे. मात्र त्यांना विस्मरणाचा आजार आहे. वेळेवर औषध न घेतल्यामुळे हा परिणाम झाला असावा, असे मत व्यक्त करण्यात आले. 3 महिन्यांपुर्वी आजोबा घरातून निघून गेले. कुटुंबाने शोधाशोध सुरू केली, परंतु पत्ता लागला नाही. अखेर मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने आजोबा सुखरुप घरी पोहचले. मेडिकलच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार या कुटुंबाने मानले. पांढरकवडा येथील पावरा पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक अविनाश इंगळे यांच्या मदतीने कायदेशीर कारवाई पूर्ण करून त्यांना कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ...And old man got his family