कोरोबाधित आढळला अन्‌ हृदयविभाग हादरला, वाचा काय झाला प्रकार... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जून 2020

11 ते 15 जूनपर्यंत हा रुग्ण सुपर स्पेशालिटीत दाखल होता. यादरम्यान विविध चाचण्या करण्यात आल्या. हृदयरोग विभागातील रुग्णांसह डॉक्‍टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी आता कोरोनाच्या रडावर आले असल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. 

नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागात "एन्जिओग्राफी' झाली. यानंतर 11 जून रोजी त्याला हृदयावरील "बायपास' शस्त्रक्रियेसाठी भरती करण्यात आले. दरम्यान, सर्दी-खोकला असल्याने त्याची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीतून कोरोना बाधित असल्याचा अहवाल आल्यामुळे सुपर स्पेशालिटीतील हृदयरोग विभाग हादरला. 

कोरोनाचा अहवाल येताच या रुग्णाला कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, 11 ते 15 जूनपर्यंत हा रुग्ण सुपर स्पेशालिटीत दाखल होता. यादरम्यान विविध चाचण्या करण्यात आल्या. हृदयरोग विभागातील रुग्णांसह डॉक्‍टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी आता कोरोनाच्या रडावर आले असल्याने येथे भीतीचे वातावरण आहे. 

क्लिक करा - सुशांतला होता हा त्रास... नियमित घ्यायचा टॅबलेट्‌स
 

इतवारी परिसरातील अनाज बाजार येथील रहिवासी असलेल्या 56 वर्षीय व्यक्तीच्या हृदयावर 5 जून रोजी एन्जिओग्राफी करण्यात आली. या एन्जिओग्राफीत त्याला हृदयवाहिन्या ब्लॉकेज असल्याचे आढळले. सीव्हीटीएस विभागात बायपास करण्याचे निश्‍चित झाले. यासाठी 11 जून रोजी त्याला सुपरच्या हृदयरोग विभागात दाखल केले. मात्र, कोरोनासदृश लक्षणे आढळल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.

घशातील द्रवाचे नमुने घेतल्यानंतर मेडिकलच्या प्रयोगशाळेतून कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. यामुळे सुपरच्या हृदय विभागात खळबळ उडाली. तत्काळ त्याला कोविड हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. डॉक्‍टर, तंत्रज्ञ आणि परिचारिका अशा एकूण चाळीस जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. 

ईको करण्यात आले 

सुपर स्पेशालिटीत हृदयात होत असलेल्या त्रासामुळे त्याची "ईको' चाचणी करण्यात आली. ही चाचणी करताना त्याच्या सभोवताल तंत्रज्ञ तसेच परिचारिका होत्या. याशिवाय कॅथलॅबमध्ये एन्जिओग्राफी करण्यात आली. यामुळे डॉक्‍टर, परिचारिका आणि तंत्रज्ञ संपर्कात आले आहेत. याशिवाय पाच दिवस हृदयरोग विभागात भरती होता. यामुळे येथील रुग्ण, नातेवाईक अशा साऱ्यांच्या संपर्कात हा रुग्ण आला. याशिवाय ईको तसेच एन्जिओग्राफी करताना हा रुग्ण सुमारे तीन तास कॅथलॅबमध्ये रांगेत होता. या दिवशी त्याच्या संपर्कात अनेक लोक आले असतील, याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. 

हीच स्थिती मेडिकलमध्ये होती 

भगवाननगर येथील 71 वर्षीय महिला रक्तदाब वाढल्यामुळे मेडिकलच्या कॅजुअल्टीमध्ये 30 मे रोजी सायंकाळी पाऊणेसहा वाजता आली. तिची प्रकृती स्थिर झाल्याने मेडिकलमधील वॉर्ड क्रमांक 47 मध्ये हलवण्यात आले. दरम्यान, श्‍वास घेण्याचा त्रास वाढल्याने तिला 2 जून रोजी रात्री 9 वाजता मेडिकलमधील "सारी' आजाराच्या वॉर्डात हलविण्यात आले. तसेच कोविड चाचणीसाठी महिलेच्या घशातील द्रवाचे नमुने घेण्यात आले. ही महिला 3 जून रोजी कोरोनाबाधित आढळून आली. दोन दिवस ही महिला वॉर्ड क्रमांक 47 मध्ये उपचारासाठी भरती होती यामुळे या वॉर्डात अधिक जोखीम आहे. मात्र, कोणत्याही डॉक्‍टर, परिचारिका किंवा कर्मचाऱ्याचे विलगीकरण केले नाही. तसेच वॉर्डाचेही निर्जंतुकीकरण करण्यात आले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Angiography patient was found to be corona positive