करोना'ची नागपुरच्या दारावर दुसरी टकटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नागपुरातील कुकडे ले-आउट येथील 46 वर्षीय व्यक्ती 25 जानेवारीला थायलंड येथून नागपूरला परतली. मित्रांसोबत सहलीला थायलंड येथे गेले होते. त्यांनी थायलंड व मलेशियातही काही दिवस घालवले. नागपूरला आल्यावर सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीसह श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. एका खासगी डॉक्‍टरकडे उपचार घेतले.

नागपूर : उपराजधानीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे करोना विषाणूचा दुसरा संशयित रुग्ण दाखल झाला आहे. थायलंडसह मलेशिया प्रवासाची पार्श्‍वभूमी असून, करोना विषाणूची लक्षणे आढळून आली. यामुळे तत्काळ दाखल करण्यात आले आहे. येथील वॉर्ड क्रमांक 25 मध्ये उपचार सुरू आहेत.

अवश्य वाचा - निघाला होता शाळेत; रस्त्यात ट्रकखाली सापडला

नागपुरातील कुकडे ले-आउट येथील 46 वर्षीय व्यक्ती 25 जानेवारीला थायलंड येथून नागपूरला परतली. मित्रांसोबत सहलीला थायलंड येथे गेले होते. त्यांनी थायलंड व मलेशियातही काही दिवस घालवले. नागपूरला आल्यावर सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीसह श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. एका खासगी डॉक्‍टरकडे उपचार घेतले. दोन दिवस आराम मिळाला. परंतु, पुन्हा श्‍वसनाचा त्रास सुरू झाला. चीन, थायलंड व आजूबाजूच्या देशांमध्ये करोना विषाणूचे थैमान असल्याचे कळल्याने त्यांनी मेडिकल गाठले. मेडिकलच्या "आयसोलेशन वॉर्डा'त त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घशातील तसेच रक्ताचे नमुने घेऊन विमानाने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. मंगळवार, 4 फेब्रुवारीला प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नेमक्‍या आजाराची माहिती होईल. दरम्यान, अतिदक्षता कक्षात करोना वैद्यकीय पथकाद्वारे उपचार सुरू आहेत. मेडिकलमध्ये झालेल्या विविध तपासण्यांतून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. वरिष्ठ डॉक्‍टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी चीनमधून आलेल्या नागपूरच्या एका व्यावसायिकाला करोना संशयित म्हणून मेडिकलला दाखल केले होते. त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्याला रुग्णालयातून सुटी दिली गेली.

उपचारासाठी विशेष पथक तयार
स्वाइन फ्लूग्रस्तांचे नमुने ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायन किटमध्ये करोना विषाणू संशयिताचे नमुने ठेवण्यात येत असल्याने हे नमुने सुरक्षित आहेत. मात्र, कोणत्याही रसायनाचा तुटवडा पडू नये यासाठी मेडिकल प्रशासनाने तातडीने नमुन्यांसाठी रसायनाची खरेदी केली आहे. तज्ज्ञ डॉक्‍टरांचे विशेष पथक करोनावरील उपचारासाठी तयार केले आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another knock on the door of Karona's Nagpur