निघाला होता शाळेत अन्‌ रस्त्यात ट्रकखाली सापडला

file
file

हिंगणा (जि.नागपूर) :  अनेक महिन्यांपासून जडवाहतूक बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे जडवाहतुकीच्या एका ट्रकने विद्यार्थ्याला चिरडल्याची घटना सोमवारी (ता.3) सकाळी 9.30 वाजता तिवस्कर वाडीत घडली. घरासमोरच विद्यार्थ्याचा जीव गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

रायपूर तिवस्करवाडी येथील ऋषीकेश भैयाजी बागडे (15) या विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाला आहे. ऋषीकेश हा नेहरू विद्यालयात इंग्लिश मीडियममध्ये नवव्या वर्गात शिकत होता. सोमवारी इंग्रजीचा पेपर असल्याने घरी अभ्यास केला. सर्दी खोकला वाटत असल्याने त्याने घरून पाच रुपये मागितले. यानंतर सकाळी 9.30 वाजता सायकलने रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी निघाला. तिवस्करवाडी निवासी वासुदेव तिवस्कर यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रकचा चालक गजानन निखाडे हा घरून रायपूर गावात जाण्यासाठी निघाला.
क्‍लिक करा :  लसुण तिनसोके पार...

घरासमोरच गेला विद्यार्थ्यांचा जीव
दरम्यान ऋषीकेशच्या सायकलला जबर धडक दिली. ट्रकच्या मागच्या चाकात सायकल आल्याने ऋषीकेश आत खेचला गेला. अपघातात सायकलचे दोन तुकडे झाले. ऋषीकेशच्या डोक्‍यावरून चाक गेल्याने मेंदू बाहेर पडला होता. यामुळे घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. अपघातात विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे बातमी पसरताच ग्रामस्थ मोठ्‌या संख्येने घटनास्थळी गोळा झाले. ट्रकचालक ट्रक घेऊन पोलिस ठाण्याच्या दिशेने पळाला. ऋषीकेश अभ्यासात हुशार होता. इंग्रजीचा पेपर असल्याने अभ्यास करून तो तयारीत शाळेत जाण्याच्या खुशीत होता. काळाने मात्र त्याच्यावर झडप घातली. या घटनेमुळे बागडे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.


ग्रामस्थांनी केली होती तक्रार
तिवस्कर वाडी येथील कथलकर यांच्या शेतातील मालकीच्या विहिरीतून पाण्याचे टॅंकर मोठ्‌या प्रमाणात तिवस्कर वाडी येथून धावतात. या टॅंकरची जडवाहतूक बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायत प्रशासन व तहसीलदारांकडे केली. मात्र या मागणीकडे सातत्याने प्रशासनाने दुर्लक्ष केले. एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन दखल घेईल का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ काही दिवसापासून विचारत होते. अखेर आज तो दिवस आला आणि ऋषीकेशचा अपघातात बळी गेला.आता तरी प्रशासन तिवस्कर वाडीतून होणा-या जड वाहतुकीला बंदी घालणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहरू विद्यालयात ऋषीकेश शिकत असल्याने शाळेनेही आज सुट्टी दिली. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश वसू व सर्व शिक्षक कर्मचानी ऋषीकेश च्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याच्या घरी नेहरू विद्यालयातील त्याचे सर्व विद्यार्थी मित्र गोळा झाले होते. अपघाता नंतर ऋषिकेशचा मृतदेहाचा पंचनामा हिंगणा पोलिसांनी केला. याप्रकरणी टक चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृतदेह उत्तरीय तपासणी तपासणीसाठी पाठवण्यात आला. यानंतर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी रायपुरातील सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

तहसील प्रशासनाचे जडवाहतुकीला अभय
रायपूर येथील कथलकर यांच्या शेतातील विहिरीतून पाण्याचे टॅंकर तिवस्कर वाडीतून धावतात. टॅंकर चालवणा अनेक चालकाकडे परवाना सुद्धा नसतो. यामुळे नवशिके चालक भरधाव वाहने चालवतात. याबाबत ग्रामस्थांनी ग्राम विकास अधिकारी वाभीटकर यांच्याकडे तक्रार केली.यानंतर तहसीलदार संतोष खांडरे यांच्याकडे सुद्धा जड वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली. तहसीलदारांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले.कुठलीही कार्यवाही न केल्यामुळे जड वाहतुकीचे टॅंकर आजही या मार्गाने धावतात. टॅंकर मालकांशी तहसील प्रशासनाचे साटेलोटे तर नसावे, ना असा संशय व्यक्त केला जात आहे. आता तर एका विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. यानंतर तरी झोपलेल्या तहसील प्रशासनाला जाग येईल का, असा प्रश्न रायपूर ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.


अपघाताची जबाबदारी घेणार का ?
रायपूर तिवस्कर वाडी येथून पाण्याच्या टॅंकरची जड वाहतूक बंद करावी, याबाबतची तक्रार तिवस्करवाडी वासीांनी ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रशासनाकडे अनेक महिन्यांपूर्वी केली होती. ग्रामविकास अधिका-या ग्राम विकास अधिका-यांनी मात्र या तक्रारीला केराची टोपली दाखवली. आता जडवाहतुकीमुळे एका विद्यार्थ्यांचा बळी गेला आहे. या अपघाताची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी घेणार का ? असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com