परवा प्रीतेश गेला आज दत्तू, दोन्ही कामगारांच्या मृत्यूने कुटुंबीयांचे दुःख अनावर, मृत्यूचे कारण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

बाजरगावलगतच्या सावंगा येथील इकॉनामी एक्‍सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनीत स्फोटांसाठी वापरण्यासाठी डेटोनेटर तयार केले जाते. येथील युनिट डी 5 मध्ये डिटोनेटर सेल्फ रिफिलिंगचे काम चालू होते. यात 23 मे शनिवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला होता.

कोंढाळी/बाजारगाव (जि.नागपूर):  इकॉनॉमी एक्‍सप्लोसिव्ह लिमिटेड सावंगा- येथे 23 मेला युनिट डी 5 मध्ये सायंकाळी पाचला झालेल्या स्फोटात गंभीर जखमी दत्तू बागडे (वय 51, शिवा) याचा रविवारी सकाळी दहाला नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने स्फोटात मृत्यूची संख्या दोन झाली आहे. यापूर्वी शनिवारी प्रीतेश जैतगुडे याचा मृत्यू झाला होता. उर्वरित जखमीत भूषण देवारे (वय 23, शिवा) व अन्य तिघांवर नागपूर येथील धंतोली खासगी हॉस्पिटलला उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : पानठेला सांभाळून चालवायची "ती'अख्खा संसाराचा गाडा, मग का उचलले तिने असे पाउल...

दुसऱ्या कामगाराचाही मृत्यू
प्राप्त महितीनुसार, बाजरगावलगतच्या सावंगा येथील इकॉनामी एक्‍सप्लोसिव्ह लिमिटेड कंपनीत स्फोटांसाठी वापरण्यासाठी डेटोनेटर तयार केले जाते. येथील युनिट डी 5 मध्ये डिटोनेटर सेल्फ रिफिलिंगचे काम चालू होते. यात 23 मे शनिवारी सायंकाळी अचानक स्फोट झाला होता. मृत दत्तू बागडे व प्रीतेश जैथगुडे यांचा मृतदेह त्यांच्या गावी शिवा येथे दुपारी 3 वाजता सरळ मृतदेह कंपनीच्या गेट नंबर 2 वर आणला. तेव्हा गावकरी मोठ्या संख्येने जमले होते.

हेही वाचाः बापरे !चक्‍क पित्याने केला पेट्रोल टाकून मुलाला संपविण्याचा प्रयत्न, कारण होते...

कामगारांकडून दगडफेक
कामगारांकडून किरकोळ दगडफेक करण्यात आली. तेव्हा पोलिस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव, ठाणेदार श्‍याम गव्हाणेसह पोलिसांनी संतप्त नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. तेव्हा मृतांच्या कुटुंबीयांना योग्य मोबदल्याची मागणी त्याचबरोबर महिला व कामगार यांना योग्य सुविधाची मागणी नागरिकांनी केली. यात कॉंग्रेसचे नेते नाना गावंडे व पोलिस अधिकारी नागेश जाधव, तहसीलदार मोहन टिकले यांनी संतप्त गावकऱ्यांच्या मदतीने कंपनी व्यवस्थापक सोमेश्वर मुंधडा यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा : तो निघाला कोरोना सर्वेक्षणाला आणि दारातच गाठले मृत्यूने !उन्हाचा तडाखा, कामाचा ताण की...

मृताच्या कुटुंबीयांना योग्य मोबदला देणार
इकॉनॉमी एक्‍सप्लोसिव्ह लिमिटेडचे महाव्यवस्थापक सोमेश्वर मुंधडा तसेच एम. के. सिंग यांनी मृताच्या कुटुंबातील सदस्याला शैक्षणिक पात्रतेनुसार तत्काळ कंपनीत नोकरी, मृताच्या कुटुंबातील प्रमुखास आजीवन पेंशन, सोबत मृताच्या कुटुंबीयांना कंपनीकडून विम्याच्या रकमेसह जवळपास 20 लाख रुपये, तर जखमींच्या उपचाराचा पूर्ण खर्च कंपनी करेल, अशीही ग्वाही दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते सलील देशमुख यांनी मृतांच्या नातेवाइकांची समजूत घातली. संध्याकाळी दोन्ही मृतांवर शिवा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला
प्रीतेश जैथगुडे मूळचा रामटेक येथील रहिवाशी होता. त्याच्या पश्‍चात आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. तो मामाकडे शिवा येथे राहत होता. दत्तू बागडे याला पत्नी, एक मुलगा व एक मुलगी तसेच आई असा परिवार आहे. या कामगारांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्यांच्या मृतदेहाकडे कुटुंबीय खिन्न मनाने पाहात होते. त्यापैकी काहींच्या डोळयांतून अश्रृंचा बांध फुुटला होता. ठाणेदार श्‍याम गव्हाने यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सध्या भूषण देव्हारे, निलेश उके, मुकेश धुर्वे व भुषण पुंड यांच्यावर उपचार सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another worker was killed in the blast