बापरे ! चक्‍क पित्याने केला पेट्रोल टाकून मुलाला संपविण्याचा प्रयत्न, कारण होते...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

गेल्या काही दिवसांपासून बाप-लेकामध्ये शेतीची वहिवाट व शेतीच्या उत्पन्नावरून वाद सुरू होता. मुलगा व बापात अनेकदा भांडणे होत. यावरून बाप नेहमी अस्वस्थ असायचा. मुलगा काही केल्या ऐकत नसल्यामुळे बापाच्या मनात मुलाविषयी राग होता.

जलालखेडा (जि. नागपूर) : जमिनीच्या वादातून मुलाने किंवा मुलीने आई-वडिलांना मारहाण किंवा हत्या केल्याचे आपण नेहमीच ऐकतो; मात्र वडिलांनी शेतीच्या वादातून मुलाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गोंडेगाव शिवारात घडली. यात मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा  :  रमजानच्या पवित्र महिन्यात ते करतात कोरोना रूग्णांची सेवा

ऐकत नसल्याने होता राग
युवनेश रामचंद्र डवरे (45, माणिकवाडा) असे जखमी मुलाचे तर रामचंद्र डवरे (80) असे आरोपी वडिलांचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून बाप-लेकामध्ये शेतीची वहिवाट व शेतीच्या उत्पन्नावरून वाद सुरू होता. मुलगा व बापात अनेकदा भांडणे होत. यावरून बाप नेहमी अस्वस्थ असायचा. मुलगा काही केल्या ऐकत नसल्यामुळे बापाच्या मनात मुलाविषयी राग होता. कितीतरी दिवस त्याने मनात मुलविरूद्‌ध राग धरून ठेवला. पुन्हा कधी अधूनमधून खटके उडू लागले. त्याने मुलाचा काटा काढण्याचे मनात पक्‍क केले आणि एक दिवस...

हेही वाचा  :  वाघिणीच्या हल्ल्यात बेसूरचे दोघे जखमी, बछडयांसह दबा धरून बसली होती शेतात

मुलगा शेतात बसला होता संत्र्याच्या झाडाखाली
योग्य संधी साधून घटनेच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी 5.30 वा सुमारास युवनेश हा माणिकवाडा शिवारात असलेल्या शेतात संत्र्याच्या झाडाखाली बसला असताना आरोपी बाप मागून आला व युवनेशच्या अंगावर पेट्रोल टाकले. त्याला जळत्या टेंभ्याने आग लावली व घटनास्थळावरून पसार झाला. या आगीत युवनेश गंभीर जखमी झाला. त्याला उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी नरखेड पोलिस ठाण्यात आरोपी वडिलांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली नसून आरोपी फरार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He tried to kill the boy by throwing petrol