कोरोनाबाधित आणि नातेवाईक यांच्यात समन्वयासाठी आता कोरोनादूत

केवल जीवनतारे
Thursday, 22 October 2020

मेडिकलमध्ये सध्या तीनशेवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ केवळ संबधित डॉक्टर, परिचारिका औषधोपरासाठी दिवसातून एक किंवा दोन वेळा जातात. यामुळे कोरोनाबाधित रुग्ण वॉर्डात एकटाच दाखल असतो.

नागपूर  ः उपचारासाठी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित मेडिकलमध्ये येत आहेत. या रुग्णांच्या नातेवाईकांना योग्य माहिती मिळावी तसेच उपचारपद्धतीत सुधारणा घडून यावी यासाठी विविध अभिनव प्रयोग केले जात आहेत. कोरोनाबाधित आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी तसेच रुग्णांची योग्य माहिती नातेवाईकांपर्यंत पोहचवण्यासाठी कार्यरत प्रशिक्षणार्थी डॉक्टर अर्थात आंतरवासिता (इंटर्न) यांना कोरोना दूत म्हणून कर्तव्यावर तैनात करण्यात येत आहे. या अभिनव कल्पनेला मूर्त रूप देण्यास सुरुवात होणार आहे.

मेडिकलमध्ये सध्या तीनशेवर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळ केवळ संबधित डॉक्टर, परिचारिका औषधोपरासाठी दिवसातून एक किंवा दोन वेळा जातात. यामुळे कोरोनाबाधित रुग्ण वॉर्डात एकटाच दाखल असतो. त्यांचा नातेवाईकांशी असलेला संपर्कही तुटतो. अशावेळी नातेवाईकांना जीव रुग्णांसाठी कासाविस होतो. यातून चुकीचे संदेश सोशल मीडियावर पोहचतात.

अतिशय चांगले काम करूनही मेडिकलची प्रतिमा मलीन होते. यामुळे नातेवाईक आणि कोरोनाबाधित यांच्यात कोरोना दूत म्हणून वैद्यकक्षेत्रातील एमबीबीएसची पदवी पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (इंटर्न) कर्तव्य सांभाळण्यासाठी जबाबदारी देण्यात येत आहे.

क्लिक करा - आता लायसन्ससाठी कुठेही जायची गरज नाही; घरबसल्या पुढील पद्धतीने काढा लर्निंग लायसन्स
 

विशेष असे की, या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशीप करावी लागते. मेडिकलमध्ये सुमारे दोनशेपेक्षा अधिक प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (इंटर्न) कार्यरत आहेत. सद्या ३०० कोरोनाबाधित उपचार घेत असून यांची माहिती नातेवाईकांना मिळावी यासाठी कार्यप्रणाली ठरविण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (इंटर्न) थेट कोरोना वार्डातून मदत केंद्रात येणाऱ्या नातेवाईकांना रुग्णाबाबत माहिती देतील.

सामाजिक अधीक्षकांची भूमिका महत्त्वाची

उपराजधानीत कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून मेडिकल, मेयोत सर्वाधिक बाधितांवर उपचार होत आहेत. सध्या मेडिकलमध्ये सर्वाधिक रुग्ण आहेत. कोरोनाबाधित रुग्ण दाखल होऊन उपचार घेत आहेत. नातेवाईकांकडून अनेकदा दाखल रुग्णांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याची तक्रार वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे घेऊन येतात. ही बाब लक्षात घेत वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सामाजिक अधीक्षक (वैद्यकीय) आणि उपक्रमात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (इंटर्न) यांच्या समन्वयातून नवीन व्यवस्था तयार केली आहे. कोरोना वॉर्डाबाहेर काही उपक्रमात प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना (इंटर्न) तैनात असणार आहेत. नातेवाईक मेडिकलच्या मदत केंद्रात आल्यास तेथून या डॉक्टरांशी संपर्क साधला जाईल. 

रुग्णहितासाठी उपक्रम
भारतीय वैद्यक परिषद (एमसीआय), महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निकषानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवीधारकाला एक वर्षाचे इंटर्नशिप आवश्‍यक आहे. या प्रशिक्षणादरम्यान रुग्णाला विविध उपचारांचे कौशल्य शिकविले जाते. कोरोना आणिबाणीच्या काळात पुस्तकी ज्ञानाला कोरोना बाधितांच्या सेवेच्या कौशल्याची जोड देण्यात येत आहे. रुग्णहितासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
-डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल

संपादन  : अतुल मांगे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appointed Corona messenger for coordination between corona patient and relatives