रेल्वेतून बालकांच्या तस्करीला बसणार चाप, विशेष पथकाची नियुक्ती

योगेश बरवड
Tuesday, 10 November 2020

कोणत्याही कारणाने घरापासून दुरावलेली बालके मानव तस्करांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यांच्या अपहरणानंतर वाहतुकीसाठी रेल्वेचा उपयोग केला जात असल्याच्या घटना अनेकदा पुढे आल्या आहेत.

नागपूर  ः बालकांचे अपहरण करून त्यांची रेल्वेतून वाहतूक करण्यात येत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने कठोर पावले उचलली आहेत. विशेष पथकांची स्थापना करून त्यांना विशेष प्रशिक्षणही देण्यात आले. ट्रेन आणि स्टेशनवर तैनात करण्यात येऊ लागले आहे. बालकांची तस्करी करणारे या पथकांच्या रडारवर आहेत.

कोणत्याही कारणाने घरापासून दुरावलेली बालके मानव तस्करांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतात. त्यांच्या अपहरणानंतर वाहतुकीसाठी रेल्वेचा उपयोग केला जात असल्याच्या घटना अनेकदा पुढे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील आरपीएफ जवानांचे पथक तयार करून मानव तस्करी रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. 

हेही वाचा - अहोऽऽ हे काय केलं? आता कशाला सोडलं पाणी; तुमच्या चुकीमुळे दिवाळी गेली ना अंधारात

कैलाश सत्यर्थी चिल्ड्रेन फाउंडेशनने प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. २० ते २५ जवानांचा समावेश असणाऱ्या या पथकाला यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आले आहे. अलीकडेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील टास्क टीम सदस्यांचेही प्रशिक्षण पार पडले.

रेल्वेगाडी आणि फलाटावर जवान लक्ष ठेवून आहेत. संशयितांची तपासणी आणि चौकशी करण्यात येत आहे. एकाकी आणि भरकटलेली लहान मुले दिसताच त्यांची विचारपूस करून चाईल्डलाईनकरवी पालकांचा शोध घेण्यात येत आहे. नागपूर विभागातील १० आरपीएफ ठाण्यातील २० ते २५ जवानांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांनी दिली.
 

तृतीयपंथीकडून बाळाची सुटका

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागासह संपूर्ण झोनमधून १९६ जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांच्यपैकीच संजीव राय आणि डी. पी. रत्रायके रविवारी (ता.८)  ०२२५१ वैनगंगा एक्स्प्रेसमध्ये गस्त घालत होते. याच गाडीतून प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयाकडे जवळपास एका वर्षाचे बाळ दिसून आले. संशय बळावल्याने जवानांनी चौकशी केली असता तृतीयपंथी बाळाचे अपहरण करून कोरबा येथे घेऊन जात असल्याची माहिती पुढे आली. लागलीच बाळाची सुटका करून तृतीयपंथीला ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी करणाऱ्या बालकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: appointment of special teams at railways and stations to curb child trafficking