ऑनलाईन खरेदी करताय? फसवणुकीपासून राहा अलर्ट!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जून 2020

सवलतींच्या बरोबरीने तुमचा खिसा कापणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. नवनवे फंडे वापरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना लुटले जात आहे. त्यामुळे "एकाच छताखाली (वेबसाईटवर) सर्व काही' विकणाऱ्यांच्या फसवेगिरीपासून स्वतःचा बचाव करण्याची गरज आहे.

नागपूर : लॉकडाऊन संपल्यानंतर हळुहळु लोक घराबाहेर पडत आहेत. बाजारात कोविड 19 संसर्गांची भिती असल्याने, सध्या ऑनलाइन खरेदीवर मोठा भर दिला जातो आहे. मागील दोन महिन्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी विविध ब्रॅन्ड्‌स आणि कंपन्यांनी अनेक आकर्षक ऑफर्सचा भडीमार ग्राहकांवर सुरू केला आहे.

किराणा मालापासून, कपडे, बुट, सौदर्यंप्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू यावर 12-15 टक्‍क्‍यांपासून ते 90 टक्के ऑफपर्यंतच्या जाहिराती दिसत असून, ऑनलाइन खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मात्र सवलतींच्या बरोबरीने तुमचा खिसा कापणाऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ होत आहे. नवनवे फंडे वापरून ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्यांना लुटले जात आहे. त्यामुळे "एकाच छताखाली (वेबसाईटवर) सर्व काही' विकणाऱ्यांच्या फसवेगिरीपासून स्वतःचा बचाव करण्याची गरज आहे.

अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का, हे वस्तूची मागणी करण्यापूर्वी तपासायला हवे. ऑनलाइन खरेदीपूर्वी सुरक्षित खरेदी कशी करावी याबाबत इंटरनेटवरून माहिती घ्यावी, ज्या कंपनीचे "प्रॉडक्‍ट' खरेदी करायचे आहे त्या कंपनीची "ऑनलाईन' खरेदी संदर्भातील माहिती तपासावी, "ऑनलाईन प्रॉडक्‍ट' विकणाऱ्या कंपनीची किंवा वेबसाईटची सत्यता तपासून पाहावी. वेबसाइटवर दिलेली कंपनीची माहिती नीट वाचावी, "ऑनलाइन' खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बॅंकेची खरी वेबसाइट लिंक दिलेली असली तरच असे तपशील भरावेत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या वेबसाईटवरून तुम्ही तुमची आवडती वस्तू खरेदी कराल, त्या वेबसाईटच्या सर्वात खालच्या ठिकाणी वेरी साईन "ट्रस्डेट' अशा पद्धतीचे "सर्टीफिकेट' दिलेले आहे की नाही हे तपासून पाहणे गरजेचे आहे.
या गोष्टी टाळा

  • शक्‍यतावरे थेट तुमच्या बॅंकेशिवाय आणि ऑनलाइन खरेदी कंपनीशिवाय इतर कोणत्याही मध्यस्थ ऑनलाईन वेबसाईटवरून आर्थिक व्यवहार करू नयेत, मौल्यवान वस्तू स्वस्त दरात विकली जात असेल तर शक्‍यतो ती वस्तू विकत घेऊ नये. घ्यायचीच असेल तर, पूर्ण माहिती आणि खात्री झाल्याशिवाय ती वस्तू खरेदी करू नये.

"सायबर सेल' कडे तक्रारी
शहरामध्ये यापूर्वीही अनेकदा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर फसवणुकीचे प्रकार घडले असून, गुन्हेही दाखल झाले आहेत. यातील काही गुन्हे उघडकीस आले आहेत. अजूनही फसवणूक झाल्याच्या तक्रारी "सायबर सेल' कडे येत आहेत. नागपूर शहरात कुणाचीही ऑनलाइन खरेदी करतांना फसवणूक झाली तर, नागपूर सायबर सेलच्या या दूरध्वनी क्रमांकावर 0712-2566766 संपर्क साधावा
तीन प्रकारे होते ऑनलाईन खरेदी-विक्रीत फसवणूक
(सायबर क्राइम सेलकडे नोंद झालेल्या खऱ्या घटनांवर आधारीत उदाहरणे)
वस्तूचा फोटो, व्हिडीओ ऑनलाईन खरेदी साईटवर अपलोड केला जातो. पण संपूर्ण पत्ता, फोन क्रमांक न देता केवळ मेसेज स्वरुपात बोलण्यासाठी म्हणून संपर्क क्रमांक दिला जातो. वस्तूच्या किंमतीच्या अर्धी किंमत आधी आणि उर्वरीत रक्कम वस्तू हाती आल्यानंतर भरा असे मेसेजद्वारे सांगितले जाते. अर्धी रक्कम भरल्यानंतर समोरून आपला संपर्क क्रमांक ब्लॉक केला जातो.
वस्तू विक्री संदर्भातही ऑनलाईन साईटवरून फसवणुकीचे प्रकार घडतात. तुम्हाला विकायच्या असलेल्या वस्तूचे मालक जरी तुम्ही असलात तरी ती वस्तू दुसराच कुणीतरी आपल्या मालकीची दर्शवून तिसऱ्याला विकून फसवणूक करतो. तुमच्या वस्तूचा केवळ ते फोटो घेऊन दुसराच कुणी स्वतःचा संपर्क क्रमांक देऊन साईटवर डिस्प्ले करतो, तुमच्या वस्तूचा आर्थिक व्यवहार करतो आणि निम्मे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे मिळाले की संपर्क क्रमांक बंद करून ठेवतो.
ऑनलाईन साईट्‌सवर लोक आपल्या वस्तू भाडेतत्वावर उपलब्ध आहेत, म्हणून जाहिरात करतात. तुमची वस्तू भाड्‌याने घेण्यासाठी तुमच्याशी संपर्क करून, वस्तूचे भाडे देऊन समोरची व्यक्ती वस्तू घेऊन जाते, ती परत देतच नाही.

 सविस्तर वाचा - उपराजधानीला मिळतेय ही नवी ओळख, वाचा हे जळजळीत वास्तव

वस्तू पाहूनच पैसे द्यावे
ऑनलाइन खरेदी करतांना कोणत्या वेबसाईटवरून खरेदी करत आहोत याकडे जाणीवपूर्वक पहावे. याशिवाय कॅश ऑन डिलीव्हरीलाच प्राधान्य द्यावे. वस्तु पाहूनच पैसे द्यावेत. बाजारातील किमतीपेक्षा अत्यंत कमी दरात कुठलीही वस्तु मिळत असेल तर फसवणूक होण्याची शक्‍यता अधिक असते. कोणीही आपला तोटा करून वस्तु विक्री करीत नाही हे लक्षात ठेवावे. ऑनलाईन खरेदीत शक्‍यतो आपले कार्ड डिटेल्स टाकू नयेत.
अश्‍विनी जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर सेल, नागपूर.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Are you doing online shopping? be alert!