
उत्तरप्रदेशातून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. राजा याची मंगळवारपर्यंत तर उमेश हत्याकांड प्रकरणात अटकेतील शाकीर व त्याच्या साथीदारांची २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे.
नागपूर : भाजीविक्रेता उमेश ढोबळे (वय ३५, रा. सोमलवाडा) याची हत्या करण्यासाठी शेख शाकीर शेख हुसेन (वय ३०, रा. भालदारपुरा) याला पिस्तूल पुरविणाऱ्या कुख्यात तस्कराला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. शेख नदीम ऊर्फ राजा गोल्डन शेख नाजीम (वय २३, रा. सिंधीबन) असे अटकेतील तस्कराचे नाव आहे. नदीम याचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन राजा हा कुख्यात शस्त्र तस्कर आहे. त्याच्याविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्यासह सहा गुन्हे दाखल आहेत. चार महिन्यांपूर्वी शाकीर याने गोल्डन राजा याच्याकडूनच ३५ हजार रुपयांमध्ये पिस्तूल खरेदी केले होते. सहा लाख रुपयांच्या वादातून शाकीर याने साथीदार सय्यद इमरान सय्यद जमल (वय २४, रा. टिमकी) याच्या मदतीने पिस्तुलातून गोळी झाडून उमेश याची हत्या केली. याप्रकरणात सक्करदरा पोलिसांनी शाकीर व इमरान या दोघांना अटक केली.
पोलिसांनी शाकीर याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान गोल्डन राजा याच्याकडून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती शाकीर याने पोलिसांना दिली. आशीर्वादनगर परिसरात राजा हा पोलिसांना संशयास्पदस्थितीत दिसला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल जप्त केले. पोलिसांनी त्याला अटक केली. कसून चौकशी केली असता पोलिसांनी त्याच्याकडून आणखी दोन पिस्तूल जप्त केले.
उत्तरप्रदेशातून पिस्तूल खरेदी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. राजा याची मंगळवारपर्यंत तर उमेश हत्याकांड प्रकरणात अटकेतील शाकीर व त्याच्या साथीदारांची २५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी घेण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी संतोष इंगळे गोविंद, रोहन, नीलेश, पवन, आरती यांनी केली.
संपादन - नीलेश डाखोरे