अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला नाकारला पॅरोल; तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने गुरुवारी (ता. 21) तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असून, त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. 

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पॅरोल रजेमध्ये मुदतवाढ देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला आहे. रविवारी त्याची रजा संपत आहे. त्याला मुंबईच्या तळोजा कारागृहात शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. 

लॉकडाउन असल्यामुळे हजर राहणे शक्‍य नसल्याने पॅरोल रजा वाढवून मिळावी म्हणून उच्च न्यायालयात त्याने तिसऱ्यांदा याचिका दाखल केली होती. त्यावर, शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. पत्नी आजारी असल्याने 13 मार्च रोजी अरुण गवळी याला 45 दिवसांची पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर 28 एप्रिल रोजी त्याला 10 मेपर्यंत पुन्हा पॅरोल रजा मंजूर करण्यात आली होती. मात्र, लॉकडाउनचा कालावधी वाढल्याने 8 मे रोजी रजा वाढवून मिळावी या विनंतीसह त्याने न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला होता. 

त्यानुसार 24 मे पर्यंत पॅरोल रजा वाढवून देण्यात आली होती. ही रजा संपत आल्याने गवळी याने गुरुवारी (ता. 21) तिसऱ्यांदा पॅरोलसाठी अर्ज केला होता. मात्र, त्याचा हा विनंती अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला असून, त्याला मुंबई येथील तळोजा कारागृह प्रशासनाकडे शरण येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. 

हेही वाचा - अल्पवयीन मुलगी सुट्ट्यांमध्ये मामाकडे राहायला आली अन् गर्भवती झाली; मग कुटुंबीयांनी पुण्यात केली प्रसूती

गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला 20 मे 2008 रोजी अटक करण्यात आली होती. त्यानुसार तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. गवळीतर्फे ऍड. मीर नगमान अली यांनी बाजू मांडली. या प्रकरणी न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arun Gawli's application was rejected