कारवाईचा धाक दाखवून मागितली लाच, परंतु हवालदाराने दाखवली हिंमत आणि... 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जून 2020

प्रदीप मधु अतुलकर (40) आणि उमेश ज्योतीराम गुटाळ (31) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. प्रदीप अतुलकर मूळचे नागपूरकर असून, त्यांचे कुटुंबीय पोलिस लाईन टाकळी परिसरात राहतात.

नागपूर : हवालदाराविरुद्ध दाखल एका गुन्ह्यात पुढील कारवाई न करण्यासाठी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक व उपनिरीक्षकांनी मिळून 35 हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दोघांनाही रंगेहात पकडले. 

प्रदीप मधु अतुलकर (40) आणि उमेश ज्योतीराम गुटाळ (31) अशी लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. ते गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. प्रदीप अतुलकर मूळचे नागपूरकर असून, त्यांचे कुटुंबीय पोलिस लाईन टाकळी परिसरात राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली गोंदिया येथे झाली होती. त्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात कार्य केले. 

हेही वाचा - प्रेमविवाहाचा करुण अंत; गर्भपात झाल्याने विवाहितेने केले असे...
 

काही महिन्यांपासून ते गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार पोलिस हवालदार असून, त्याच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास गुटाळ करीत होते. दरम्यान, त्या प्रकरणी संबंधित हवालदाराविरुद्ध बाल अत्याचार कायद्यांतर्गतही कारवाई होऊ शकते, शब्दात धमकावून भविष्यात नोकरी करताना अडचणी निर्माण होतील. या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून कारवाई शिथिल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी 35 हजार रुपयांची लाच मागितली. 

हवालदारांची लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी शहानिशा केली. त्यावेळी अतुलकर यांनी पोलिस उपनिरीक्षक गुटाळ यांच्याकडे पैसे द्यावे, तक्रारदाराशी तडजोड करून त्यांच्या प्रकरणाचा निपटारा होऊन जाईल, असे सांगितले. एसीबीने उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, शिवशंकर तुमडे, विजय खोब्रागडे यांनी शुक्रवारी दुपारी सापळा रचला व अतुलकर यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Inspector of Police, Sub-Inspector arrested for taking bribe