एटीएम फोडून लांबवली दीड लाखांवर रक्कम, परराज्यातून आवळल्या पोलिसांनी मुसक्या 

योगेश बरवड
Friday, 18 September 2020

रविशंकर अनुज पांडे (२२) रा. कनौती पोस्ट, बक्तीयारपूर, पटणा, बिहार असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी ६ ते ७.४५ दरम्यान त्याने पाना, पेंचीसच्या मदतीने एटीएमचे कॅश शटर तोडले.

नागपूर : आशीर्वादनगरातील व्दारका कॉम्प्लेक्सच्या पहिल्या माळ्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून १.६६ लाखांची रोख पळवून नेणाऱ्या चोरट्याल अटक करण्यात सक्करदरा पोलिसांना यश आले आहे. बिहार राज्यातील रहिवासी असणारा चोरटा आपल्या गावी पळून जात असताना त्याला छत्तीसगढ राज्यातून शिथापीने अटक करण्यात आली.

रविशंकर अनुज पांडे (२२) रा. कनौती पोस्ट, बक्तीयारपूर, पटणा, बिहार असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. शनिवारी सकाळी ६ ते ७.४५ दरम्यान त्याने पाना, पेंचीसच्या मदतीने एटीएमचे कॅश शटर तोडले. आतील ५०० रुपये किमतीच्या ३३२ नोटा म्हणचेच १ लाख ६६ हजार रुपये घेऊन तो पळून गेला. 

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

याप्रकरणी ईपीएस कंपनीचे एटीएम अधिकारी श्रीधर केदार यांच्या तक्रारीवरून पोलिसांना गुन्हा दाखल केला. एटीएमच्या अतील व पारसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. यात चोरटा घेऊन आलेल्या दुचाकीचा क्रमांक पोलिसांना मिळाला. त्याआधारे पोलिस भवानानगरातील परमानंद पांडे (३५) याच्यापर्यंत पोहोचले. गडी आपलीच असली तरी दहा दिवसांपूर्व गावाकडून आलेला नातेवाईक रविशंकर याला वापराला दिली असल्याचे त्याने सांगितले. 

सीसीटीव्‍ही फुटेजमध्ये दिसणारा चेहरा दाखविला असता चोरी करणारा रविशंकरच असल्याचे परमानंदने ओळखले. सोबतच तो आपल्या स्विफ्ट कारने आला होता आणि त्याच कारने गावी परत निघल्याचेही सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळवीत त्यांचे लोकेशन काढले असता मंगळवारी सायंकाळी तो भंडारामार्गे छत्तीसगढच्या दिशेने निघाल्याचे दिसून आले.

लागलीच पोलिस खासगी वाहनातून त्याचा पाठलाग करीत निघाले. काही वेळानंतर आरोपीने महाराष्ट्राची सीमा ओलांडून छत्तीसगढ राज्यात प्रवेश केल्याचे लक्षात आले. त्यानुसार स्थानिक पोलिसांना आरोपी व त्याच्या वानहाची माहिती देऊन त्याला थांबवून घेण्याबाबाबत सूचना देण्यात आली. दुर्ग जिल्ह्यातील सुपेला पोलिसांनी त्याला थांबवून घेतले. काही वेळातच सक्करदरा पोलिसांनी तिथे धडकून आरोपीला ताब्यात घेतले.
 

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

आरोपीने अशाप्रकारे अन्य ठिकाणीही एटीएम फोडले असण्याची शक्यता आहे. त्याने यापूर्वीही नागपुरात अशा प्रकारच्या चोऱ्या केल्या असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. सोबतच एटीएममधून चोरलेल्या रकमेचे त्याने काय केले, या दिशेनेही तपास करण्यात येत आहे. 

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ATM burglar arrested by Sakkarada police from Bihar