नागपुरात धुमाकूळ घालणारी ‘एटीएम हॅकर्स’टोळी अटकेत,  ‘सकाळ’च्या वृत्ताने जागी झाली यंत्रणा

ATM hackers arrested by Nandanvan police
ATM hackers arrested by Nandanvan police

नागपूर  ः परराज्यातील सायबर हॅकर्सच्या टोळीने उपराजधानीला टार्गेट करीत एटीएममधून लाखोंची रक्कम उडवण्याचा धडाका सुरू केला होता. शहरातील विविध भागातील एटीएम खाली करीत हॅकर्स बॅंकेला चुना लावत होते. नागपूर पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या टोळीला अटक करण्यात अखेर नंदनवन पोलिसांना यश आले. ‘सकाळ’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले होते, हे विशेष.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्याभरात शहरातील नागपूर रेल्वे स्टेशन, गिट्टीखदान, वाडी आणि प्रतापनगर परिसरातील राष्ट्रीयकृत बॅंकेचे एटीएम तांत्रिक पध्दतीने हॅक करून चोरट्यांनी लाखो रूपये लंपास केले होते. ही टोळी पकडण्यासाठी क्राईम ब्रॅंच आणि ठाणेदारांच्या टीम प्रयत्न करीत होत्या. शेवटी नंदनवन पोलिसांना या टोळीला जेरबंद करण्यात यश आले. जगनाडे चौकात असलेल्या बॅंकेच्या व्यवस्थापक दीनानाथ पाटील (बेलतरोडी) यांनी एटीएममधून पैसे गायब झाल्याची तक्रार नंदनवन पोलिस ठाण्यात दिली. 

त्यामुळे ठाणेदार संदीपान पवार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात दोन चोरटे एटीएम हॅक करून पैसे काढत असल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच काही एटीएमची निवड करून सापळा रचला. दोन दिवस मेहनत घेतल्यानंतर बुधवारी दोन आरोपी एटीएममध्ये घुसताना दिसले. त्यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न करताच पोलिसांवी दोघांना अटक केली. आसिफ खान जुम्मा खान (२१) आणि सहादत्त खान मोहम्मद खान (दोघेही रा. चंदेनी, ता. नूह. जि. मेवात-हरियाणा) अशा अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

त्यांनी शहरातील चार एटीएममधून साडेपाच लाख रूपये काढल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून २२ एटीएम कार्ड, ३ मोबाईल्स, ४ लाख ६५ हजार रूपये (खात्यात गोठविलेले) आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई डीसीपी विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनात पीआय संदीपान पवार, एपीआय शंकर धायगुडे, संजय शाहू, विकास टोंग, विनोद झिंगरे, स्वप्निल तांदूळकर यांनी केली.
 

आरोपी दहावी नापास

टेक्निकल एक्सपर्ट असलेल्या सायबर गुन्हेगार आसिफ आणि शहादत हे दोघेही दहावी नापास आहेत. त्यांनी एटीएम हॅक करण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आतापर्यंत या दोघांनी देशातील अनेक राज्यातील मोठमोठ्या शहरातील एटीएम फोडले आहे. त्यातून कोट्यवधी रुपये लंपास केले आहेत. आरोपींचा रविवारपर्यंत पीसीआर घेण्यात आला असून, त्यांच्याकडून रोख रक्कम जप्त करण्यात येणार आहे.
 

पैसे खात्यात जमा


एटीएममध्ये कुणी नसताना आरोपी आतमध्ये शिरत होते. डेबीट कार्डचा वापर करीत पैसे निघण्यापूर्वी टेक्निक वापरून अतिरिक्त पैसे काढत होते. ते पैसे ग्राहकाच्या खात्यातून न काढता थेट बॅंकेच्या मेन बॅलन्समधून डेबिट करीत होते. त्यामुळे कुणीही ग्राहक तक्रार करीत नव्हते तर बॅंकेचा हिशोब महिन्याच्या शेवटच्या दिवशी असल्याने महिनाभर उशिरा लक्षात येत होते. आरोपी तोपर्यंत कॅश डिपॉजीट मशिनचा वापर करीत हरियानात पैसे पाठविले जायचे. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com