कोरोना संसर्गापासून "आत्मा' ठेवणार लांब... वाचा काय आहे भानगड...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जून 2020

प्रवासी रेल्वेस्थानकावर येताच त्यांचे तापमान मोजणे आणि तिकीट तपासणे आवश्‍यक आहे. आजवर टीटीई हे काम करायचे. अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप टाळणे शक्‍य झाले असून प्रवासी आणि कर्मचारी अशा दोघांसाठीही ही प्रणाली हितकारी ठरली आहे. मेसर्स ईजी स्टीटच्या सहकार्याने नागपूर स्थानकावर हे यंत्र लावण्यात आले आहे.

नागपूर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यात भौतिक अंतर राखणे हिच परिणामकारक खबरदारी आहे. पण, रेल्वेकर्मचाऱ्यांना सतत प्रवाशांच्या गराड्यात रहावे लागले. यातून प्रवासी आणि कर्मचारी दोघांनाही संसर्गाचा धोका संभावतो. कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर अत्याधुनिक "आत्मा' (ऑटोमेटेड तिकीट चेकिंग ऍन्ड मॅनेजिंग ऍसेस) यंत्रणा बसविण्यात आली आहे. या स्वयंचलित यंत्राच्या मदतीने प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग आणि तिकीट तपासणीही केली जात आहे.

प्रवासी रेल्वेस्थानकावर येताच त्यांचे तापमान मोजणे आणि तिकीट तपासणे आवश्‍यक आहे. आजवर टीटीई हे काम करायचे. अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप टाळणे शक्‍य झाले असून प्रवासी आणि कर्मचारी अशा दोघांसाठीही ही प्रणाली हितकारी ठरली आहे. मेसर्स ईजी स्टीटच्या सहकार्याने नागपूर स्थानकावर हे यंत्र लावण्यात आले आहे.

प्रवासी सोशल डिस्टंसींग पाळत पुढे येतील. यंत्रापुढे उभे राहताच प्रथम हे यंत्र संबंधित प्रवाशाच्या शरीराचे तापमान मोजेल. फेस मास्क असल्याची खात्री केल्यानंतर तिकिटाची तपासणीही यंत्रच करेल. येवढेच काय आरोग्य सेतू ऍप मोबाईलवर डाऊनलोड असल्याची खात्री करून प्रवाशाला पुढे जाता येईल. अगदी काही मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते. कोणतीही अडचण आल्यास ती सोडविण्यासाठी दुतर्फा ध्वनिक्षेपक बसविण्यात आला आहे. त्यातून रेल्वे अधिकारी आणि प्रवाशात संभाषणाची सोय आहे. पण, मध्ये काच असल्याने दोघेही एकमेकाच्या संपर्कात येणार नाहीत.

हेही वाचा : आता तुम्हीच सांगा, नियम विद्यापीठाचा मान्य करायचा की राज्यशासनाचा

या यंत्रणेची एक लिंक आरपीएफकडेही असेल. प्रत्येक पाळीत आरपीएफ जवान त्यावर लक्ष ठेवून असेल. संपूर्ण तपासणी आणि खबरदारी करूनच प्रवाशाला आत प्रवेश मिळेल. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत या यंत्रणेचा शुभारंभ झाला. याप्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पाण्डेय, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थुल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.

केवळ 48 तासात करार
महसूल वाढीसाठी रेल्वे प्रशासनाकडून अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी केली जात आहे. "आत्मा'सुद्धा महसूल मिळवून देणारी यंत्रणा आहे. या अत्याधुनिक यंत्राची उपयोगिता लक्षात घेता नागपूर विभागाने ती स्वीकारण्याची आग्रही भूमीका घेतली. केवळ 48 तासांमध्येचे कराराची प्रक्रिया पूर्ण करीत यंत्रणा कार्यान्वितही करण्यात आली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "ATMA" will keep away from corona infection